04/02/26
Breaking News

पूर्णेत धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन – राज्य महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

पूर्णा प्रतिनिधी / सुशिल कुमार दळवी – धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णा येथे मोठे स्वरूप प्राप्त झाले. जालना येथे मागील पंधरा दिवसांपासून संघर्षयोद्धा दीपक भाऊ बोऱ्हाडे उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ १ ऑक्टोबर रोजी पूर्णा शहराजवळील ताडकळस टी पॉइंट येथे सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनात तालुक्यासह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे समाजबांधवांनी आपल्या पारंपरिक जीवनशैलीचे प्रतीक असलेल्या मेंढ्यांना घेऊन आंदोलनस्थळी हजेरी लावली होती. त्यामुळे राज्य महामार्ग क्रमांक 61 वरील वाहतूक तब्बल दीड ते दोन तास ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले.

सन 2014 मध्ये बारामती येथे धनगर समाजाच्या महासागराला संबोधित करताना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले होते की, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत पुरेसे पुरावे उपलब्ध असून सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत त्याची अंमलबजावणी केली जाईल. मात्र सत्ता हातात येऊन शेकडो कॅबिनेट बैठका झाल्या, असंख्य आंदोलने झाली तरीदेखील आजतागायत हा दिलेला शब्द पाळलेला नाही. याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक, अंबड चौफुली (जालना) येथे दीपक भाऊ बोऱ्हाडे यांनी पंधरा दिवसांपासून जल–अन्न त्याग करून उपोषण सुरू ठेवले आहे. सरकारने अद्याप त्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत देत कठोर इशारा दिला की, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषण सोडवले नाही तर राज्यभर उग्र आंदोलन छेडले जाईल आणि लढा आणखी तीव्र केला जाईल.

 

आंदोलनादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. चक्काजाममुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असली तरी आंदोलनकर्त्यांनी अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांना मात्र मार्ग उपलब्ध करून दिला.

 

पूर्णा तालुक्यातील मोठ्या संख्येने धनगर समाज बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेवटी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, आता वेळकाढूपणा सहन केला जाणार नाही. धनगर समाजाला घटनात्मक न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील आणि आवश्यक असल्यास धनगर बाणा दाखवून राज्यव्यापी उग्र आंदोलन उभारले जाईल.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …