परभणी – येथील शारदा महाविद्यालयात सायबर सेल परभणी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने सायबर कायद्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणी येथील नानल पेठचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारोती कारवर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गोपिका सोनेत, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकुळे, नानल पेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल बजास बोबडे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष नाकाडे उपस्थित होते.
यावेळी पहिल्या सत्रात एपीआय मारोती कारवर यांनी पोलिसांचे कार्य व ओळख या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पोलिसांची कर्तव्ये सांगत असताना सार्वजनिक सुव्यवस्था राखणे, कायदा लागू करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे आणि जीविताचे रक्षण करणे ही कर्तव्ये असून समाजात सुरक्षितता व शांतता निर्माण करणारी सरकारी यंत्रणा म्हणजे पोलीस असे मत व्यक्त केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाखुळे यांनी सायबर गुन्हेगारी व सिक्युरिटी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत सध्याच्या युगात डिजिटल साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे असे मत प्रतिपादन केले. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गोपिका सोनेत यांनी सध्याच्या परिस्थितीत महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे तसा काही प्रकार जरी लक्षात आला तर भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी त्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत असे मत प्रतिपादन केले.
त्यानंतर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सायबर गुन्हेगारीसंदर्भात सर्वांनी जागृत रहाणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन खडके, प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ सिंगापूरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com