परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
परळी येथील न्यू हायस्कूल शाळेचा विद्यार्थी चिरंजीव वरद श्रीराम लांडगे (इयत्ता आठवी) याने विभागीय जलतरण स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. फक्त पहिल्याच प्रयत्नात विभागीय विजेतेपद मिळवून वरदने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून हा परळी तालुका व न्यू हायस्कूल शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून आगामी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये तो आता बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
इयत्ता आठवीत शिकणारा वरद श्रीराम लांडगे या न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात विभागीय जलतरण स्पर्धा जिंकली आणि तो आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पहिल्याच प्रयत्नात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेपर्यंत मजल मारणारा वरद हा न्यू हायस्कूल शाळेचा पहिलाच विद्यार्थी आहे. त्याने 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात उत्कृष्ट जलतरण कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. त्याच्या अथक मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे यश मानले जात आहे या यशासाठी त्याला स्विमिंग कोच संजय भगत सर आणि शालेय क्रीडा शिक्षक नारायण वानखेडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वरदच्या या उल्लेखनीय यशाने शाळेची परळीची तथा बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली असून या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके, सचिव आमदार सतीशभाऊ चव्हाण तसेच शालेय समिती परळी वैजनाथचे अध्यक्ष नानासाहेब (काका) सोळंके यांनी वरदच्या यशाची प्रशंसा करत अभिनंदन करून त्याला आगामी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोरे, के. व्ही. पर्यवेक्षिका सौ. छाया देशमुख, क्रीडा शिक्षक श्री. नारायण वानखेडे, श्री. अमर देशमुख तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरदचा सत्कार करत पालक आणि विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन केले. वरदच्या विजयामुळे शाळा, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याच्या यशस्वीतेसाठी सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वरदच्या यशाने परळीतील क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत तो नक्कीच यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com