बोगस मतदान नोंदवले गेले नसते तर ५० हजार मतांनी निवडून आलो असतो– आमदार अमोल खताळ
संगमनेर : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मालपाणी लॉन्स येथे प्रथमच दिवाळी फराळ व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. पराभवानंतर काहीजणांचे संतुलन ढासळले असून आता ते राज ठाकरेंना पुढे करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
आमदार अमोल खताळ म्हणाले, मधल्या काळात पराभवामुळे बावचळलेली काही लोकं, ज्यांना वाटत होतं की आमचा पराभव कोणीच करू शकत नाही, त्यांनी ईव्हीएमवर दोष टाकण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे भरून अर्ज केले, पण नंतर स्वतःच अर्ज मागे घेतला. आता हेच लोक राज ठाकरेंना पुढे करतायत आणि सांगतायत की संगमनेरमध्ये एक लाख मतांनी पराभव झाला.
आमदार खताळ पुढे म्हणाले, आमचा विजय १० हजार ५६० मतांनी झाला. विरोधकांच्या बोगस मतदानामुळे हा विजय कमी फरकाने झाला. त्यावेळी ५० हजारांच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले असते. असा दावा आमदार अमोल खताळ यांनी केला. तसेच विरोधकांनी अनेक वार्डांमध्ये आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बोगस मतदान नोंदवलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने बूथवर लक्ष ठेवून बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
आमदार खताळ यांनी भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर महायुतीकडून तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रिया यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलेल्या प्रश्नचिन्हाला सडेतोड उत्तर आमदार अमोल खताळ यांनी दिले आहे.
कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, तालुक्यात एकत्रितपणे एकदिलाने परिवर्तन घडवले त्याबद्दल कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन, एक सामान्य कार्यकर्ता अमोल खताळ यांच्या रूपाने मागच्या दिवाळीची भेट जनतेने संगमनेर तालुक्याला दिली. अशाचप्रकारे येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था या दिवाळीला भेट म्हणून महायुतीला देण्याचा निर्धार करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
Shabdraj www.shabdraj.com