04/02/26
Breaking News

पाथरीत मोठा राजकिय भुकंप,अनिल नखाते यांच्यावर अविश्वास ठराव

रमेश बिजुले
पाथरी,दि 31 

काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्ष होताच पहिला झटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला आहे.पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमदार राजेश विटेकर यांचे कट्टर समर्थक अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे.

 

पाथरी मतदार संघात आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वरचष्मा आहे. मागील वर्षभरात बदलत्या राजकीय समीकरणात दुर्राणी यांची साथ सोडलेले अनेक जण आता परत येऊ लागले आहेत. बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी दुर्राणी यांची साथ सोडल्यानंतर  दुर्राणी काही दिवस शांत होते. आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळताच दुर्राणी यांनी  हालचाली सुरू केल्या आहेत. दुर्राणी यांचे सर्व समर्थक आता एकवटले आहेत.

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात येता पाथरी मानवत सोनपेठ या भागातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते दुर्राणी यांच्या समवेत आले आहेत. पाथरी नगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे दुर्राणी यांचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे दुर्राणी अनेकांना तडाखे देणार हे याची चाहूल लागली होती. त्यात त्यांच्या निशाण्यावर  पाथरी बाजार समिती आली.दुर्राणी यांनी मोठी राजकीय खेळी करत थेट शिवसेना शिंदे गटाचे पाच संचालक फोडले आणि नखाते यांच्या विरोधात 13 सदस्यांनी थेट अविश्वास दाखल केला. याबाबत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची शुक्रवारी भेट घेऊन तेरा संचालकांनी अविश्वासाचे पत्र दिले. सभापती हे समितीच्या हिताचे निर्णय घेत नाहीत, मनमानी पद्धतीने कामकाज करून स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना बाजार समितीच्या मालकीच्या विविध योजनांचे फायदे मिळून देत आहेत व सभापती पदाचा गैरवापर करीत आहेत असा आरोप यात करण्यात आला, त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही असे देखील नमूद केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती हे कोणत्याही संचालकास विश्वासात न घेता कामकाज करीत आहेत. मासिक बैठकीच्या वेळेस ऐनवेळीचा विषय मांडून कामकाज करत आहेत. कोणतीही पूर्वकल्पना संचालकांना देत नाहीत मनमानी कारभार करून आर्थिक बाबीच्या विषयावर संचालकाचे मत न घेता कामकाज करीत आहेत असा आरोप करण्यात आला तसेच सभापती हे बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षीत आहे परंतु ते तसे न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सभापती पदाचा गैरवापर करत आहेत असा गंभीर आरोप या संचालकांनी केला आहे. त्यामुळे आम्ही राजीखुशीने व बाजार समितीच्या हितासाठी अविश्वास मागणी पत्र दाखल करीत आहोत असे यात नमूद केले.

 

यावेळी बाबाजानी दुर्राणी यांच्यासह संचालक एकनाथ घाडगे, किरण टाकळकर, संतोष गलबे, संजीव सत्वधर,गणेश दुगाने, शेख दस्तगीर, शाम धर्मे, विजयकुमार सिताफळे, अशोक अरबाड, संदीप टेंगसे, आनंद धनले, अमोल बांगड हे संचालक यावेळी उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …