04/02/26
Breaking News

गंगाखेडात नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीकडून सौ. निर्मला तापडिया यांना उमेदवारी

 रामप्रसाद ओझा
गंगाखेड,दि 07 ः
शहर विकास आघाडी तर्फे गंगाखेड नगराध्यक्ष पदासाठी सौ. निर्मला गोपालदास तापडिया यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. आघाडीचे नेते आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी ही घोषणा करताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्यांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.

नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत तेरा प्रभागांसाठीच्या सर्व २६ जागांच्या उमेदवारांची घोषणा देखील लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी भावना व्यक्त करताना गोपालदास तापडिया म्हणाले की, “माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत जबाबदारी दिल्याबद्दल आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाचा अनुशेष दूर करून लोकाभिमुख कार्य करण्यात मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.”
निर्मला तापडिया या गोपालदास तापडिया यांच्या पत्नी आहेत. गोपालदास तापडिया हे गंगाखेड शहर व परभणी जिल्ह्यातील चाणाक्ष, समन्वयक आणि अनुभवी राजकारणी म्हणून सर्वपरिचित नाव.राजकारणात काका–पुतणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी आमदार स्व. रतनलाल तापडिया आणि गोपालदास तापडिया या जोडीनं गंगाखेड विधानसभा ते परभणी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष आणि अपक्ष उमेदवार ॲड. मा. खा. गणेशराव दुधगावकर यांच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती.तसेच विधानपरिषद निवडणुकीत रतनलाल तापडिया व रजनीताई सातव यांच्या विजयातही गोपालदास तापडिया यांच्या प्रचारयंत्रणेचा मोलाचा वाटा होता.२०१६ मध्ये संपन्न झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावत विजय खेचून आणला. त्यावेळी रासपा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले होते.

“आम्ही केलेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांच्या जोरावरच ही निवडणूक लढवणार आहोत.
लक्ष्मी अस्त्रं किंवा प्रलोभने दाखवून निवडणूक जिंकण्याची आमची पद्धत नाही आणि आम्ही तसा मार्ग स्वीकारणारही नाही,”असा ठाम सूर आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केला.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …