04/02/26
Breaking News

शिवसेना (शिंदे गट) ताकद दाखवणार – गंगाखेडात जयप्रकाश मुंदडा यांचा कडक आढावा

गंगाखेड / रामप्रसाद ओझा – आगामी गंगाखेड नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी तापू लागली असताना शिवसेना (म.ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) परभणी जिल्हा मंत्री व माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आज गंगाखेडात घेतलेल्या भव्य आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना “आता निवडणुकीत ताकद दाखवण्याची वेळ आली आहे” असा दमदार संदेश दिला.

 

शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत नगरपरिषद निवडणूक पूर्ण क्षमतेने व संघटित पद्धतीने लढविण्यासाठी प्रभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. तालुकाप्रमुख शाहूराव मुंडे, शहरप्रमुख अंगदराव बंगाळ, युवासेना शहरप्रमुख रजत गायकवाड यांना प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांवर प्रभागनिहाय कणा मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले.

 

बैठकीत डॉ. मुंदडा म्हणाले की,  “शिवसैनिक ही आपली खरी ताकद आहे. गंगाखेडात शिवसेना संघटना ठाम, सक्षम आणि लढाऊ आहे. ही निवडणूक फक्त सत्ता नव्हे तर शिवसेनेची अस्मिता आहे. प्रत्येक शिवसैनिकाने आपापल्या प्रभागात घराघरात जाऊन शिवसेनेचा झेंडा उंच ठेवावा.”

 

या वेळी विधानसभाप्रमुख राम लटके, तालुका संघटक रामकिसन शिंदे, उपतालुकाप्रमुख भानुदास शिंदे, शहर समन्वयक भारत केंद्रे, उपशहरप्रमुख सुरेश उंदरे, जिल्हा दलित आघाडी प्रमुख लिंबाजी व्हावळे, उपजिल्हाप्रमुख शशिकांत गवळी, तालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड यांच्यासह प्रकाश शिंदे, भुषण कुलकर्णी, अजय जाधव यांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीने शिवसेना संघटना गंगाखेडात सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या बैठकीतून झाला. इच्छुक उमेदवार व पदाधिकारी प्रचंड उत्साहात दिसले. गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आता “पूर्ण ताकतीने – रणांगणात तयार” असा सूर स्पष्ट ऐकू येऊ लागला आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …