04/02/26
Breaking News

सेलूत अक्षर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

सेलू ( प्रतिनिधी )
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान, सेलू जिल्हा परभणी आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन सेलूत संपन्न होणार आहे.

बी. रघुनाथ साहित्य नगरी,देविदास कुलकर्णी सभागृह, साई नाट्य मंदिर, सेलू येथे रविवार ( दि. १६ ) रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
या संमेलनास पालक मंत्री नामदार मेघना  बोर्डीकर-साकोरे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर बालरंगभूमीच्या अध्यक्ष निलम-शिर्के सामंत ( मुंबई ), कवी इंद्रजित भालेराव, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई,चे सदस्य प्रकाश होळकर, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. राजेश गायकवाड बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड ( मुंबई ), कथाकार विलास सिंदगिकर (लातूर) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला शनिवार ( दि.१५) रोजी सायंकाळी सहा वाजता स्वा.सै.गिताबाई विनायकराव चारठाणकर मंचावर महिला मंडळ, सेलू आयोजित ‘संतवाणी’ कार्यक्रम संपन्न होणार आहे . तर रविवार ( दि. १६ ) रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते संमेलन स्थळ साई नाट्य मंदिरापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे .या ग्रंथ दिंडीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, लेझिम पथक, साहित्यिक, नागरिक सहभागी होतील. दुपारी बारा वाजता ‘ कृषी व्यवस्थेतील घटकांचे प्रश्न आणि मराठी साहित्य ‘ या विषयावर शंकरराव मंडलिक मंचावर परिसंवाद, दुपारी दोन वाजता कथाकथन, दुपारी तीन वाजता कवी प्रा. पं.या. तरफदार काव्य मंचावर निमंत्रितांचे कवी संमेलन, तर साहित्य संमेलनाचा समारोप साडे चार वाजता प्रकाश कामतीकर मंचावर होईल.

नूतन कन्या प्रशालेत दुर्गाताई कुलकर्णी साहित्य नगरी, कमलबाई बाहेती सभागृहात आयोजित बालकट्यात जिल्ह्यातील विविध शाळेतील दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील. दुपारी एक ते पाच या वेळेत बालकांचे कथाकथन, कवी संमेलन व नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखर्णी नृसिंह चे ‘हामुरा’ , जिल्हा परिषद प्रशाला, कुंडी चे ‘सुंदर माझं गाव’, तर एल. के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड जूनियर कॉलेज, सेलू चे ‘ विज्ञानातील महिला ‘ हे बालनाट्य सादर होईल. कार्यक्रम स्थळी अँड. वसंतराव खारकर चित्र प्रदर्शन दालनात वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन असणार आहे.

श्रीरामजी भांगडीया साहित्य नगरी, रा.ब. गिल्डा सभागृहात घनश्याम सांगतानी, कथाकार गणेश घांडगे, गझलकार नाना बेरगुडे मंचावर निमंत्रितांचे कवी संमेलन व गझल मुशायरा दुपारी दोन ते पाच या वेळेत होईल. कृष्णाचार्य मुंगीकर मंचावर दुपारी दोन वाजता कवी कट्टा संपन्न होईल. यात जिल्ह्यातील १०४ कवी, गझलकार सहभागी असतील. साहित्य संमेलन यशस्वीतेसाठी संयोजन समिती परिश्रम घेत आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …