ग्रंथदिंडीतील के बा विद्यालय व नूतन कन्या मधील मुलींच्या लेझीम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष
सेलू / प्रतिनिधी – येथील मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून पहिले अक्षर प्रतिष्ठान जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन रविवार १६नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थानी आसाराम लोमटे हे होते .तर माया लोमटे,साहित्य अकादमी मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर, मार्तंड कुलकर्णी, श्रीधर नांदेडकर, राजेश गायकवाड,मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाध्यक्ष विनायकराव कोठेकर, स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने , कार्याध्यक्ष राम निकम,बाजार समिती सभापती डॉ.संजय रोडगे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस एम लोया, जयप्रकाश बिहाणी,सरचिटणीस शरद कुलकर्णी विलास संदीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना चंद्रकात कुलकर्णी म्हणाले की, आमच्या बालपणी पुस्तक विकत घेणे शक्य नव्हते. कारण जगणं महत्त्वाचे होते
.आज आपण आपला खर्च कुठे करतो? याचा विचार करणे गरजेचे आहे.दूरचित्रवाणी च्या माध्यमाद्वारे साहित्य दाखवणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाने वाचनालयात जाऊन पुस्तके वाचली पाहिजेत.मध्यमवर्गाने कलेचे व साहित्याचे वाचन करून पुस्तके विकत घेतली पाहिजेत. त्यामुळे साहित्य संस्कृती जपली जाईल. वर्तमानपत्र देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण ती भाष्य म्हणून काम करतात. तो दृष्टिकोन मिळावा यासाठी ते खूप मोलाचे आहेत. साहित्य ही तातडीने प्रतिक्रिया देत नसतात.साहित्य संमेलनाचा उपयोग तरुण मुलांमध्ये वाचनाची सवय वाढीस लागली पाहिजे. प्रत्येक मुलांपर्यंत मराठी साहित्य पोहोचवले गेले पाहिजे. अभिजात दर्जा भाषेला मिळाला पण तो आपल्या जगण्यात देखील आला पाहिजे. गावाकडील व्याख्यानं व मराठी शाळा बंद होत आहेत. नूतन शिक्षण संस्थेसारखी एक शिक्षण संस्था जगते तेव्हा पंचक्रोशीतील तीन चार पिढ्यांचे कल्याण होत असते. त्यामुळे बंद पडलेल्या मराठी शाळा याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मातृभाषेत झाले तरच जीवन जगणं सुलभ होते. आजची उच्च पदस्थ मंडळी यांचे शिक्षण मातृभाषेतूनच झालेले आहे. मुळात इंग्रजी ही ज्ञान भाषा नाही. ती केवळ भाषा आहे. मराठी बोललं लिहिलं गेलं पाहिजे. सोशल माध्यमातून मराठी लिहिता आले पाहिजे.माध्यमांनी खूप गोंधळ घातला असून वर्तमान काळातील तरुण पिढीचं लिहिणं व वाचन दोन्हीही बंद करून टाकलं असल्याची खंत देखील यावेळी बोलताना चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मी नाट्य क्षेत्रात काम करत असताना साहित्य क्षेत्रातील मंडळींनी माझी दखल घेऊन मला बोलावले, नाट्य क्षेत्र हे साहित्याच्या महावृक्षाची फांदी आहे सेलू आणि परभणी हे माझे गाव व आजोळ देखील आहे.त्यामुळे मुंबई ते सेलू प्रवासात मी खूप मागे जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. कारण प्रवासातून आयुष्याच्या आढावा घेता येतो.नाटकाच्या संविदेला अर्धसाहित्य म्हणतात. नाटके लोकशाहीवादी प्रक्रिया मानणारी कला आहे. साहित्यातून नाटकाचे रूपांतर करताना सांस्कृतिक पूल बांधलेला आहे. साहित्याचा आणि नाटकाचा संबंध आहे. नाटक हे साहित्याच्या पोटातून उमलते , असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
ज्यांना बोलायचे व लिहायचे ते गप्प का आहेत?त्यांनी समाजातील सगळ्या प्रश्नांवर लिहिणे गरजेचे आहे. लिहिणे ही गोष्ट इतकी सोपी नाही,मात्र लेखकांच्या लिखाणातून म्हणजेच साहित्यातून अमृत निर्माण होत असल्याचे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आसाराम लोमटे यांनी केले आहे.ते उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, इथल्या माणसाचे जगण्याचे भानं सुटत नाही,त्यामुळे समाजातील सगळ्या प्रश्नांवर लिहिणे गरजेचे आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार संकटांशी सामना करणारा शेतकरी जी गोष्ट आपल्याला पेरायची आहे अथवा पुढच्या पिढीच्या हातात द्यायची आहे ते दळून कधी खायचे नाही हे शेतकऱ्यांनी कायम जपले.आपण तर अक्षरांची शेती करतो.ते अतिशय सोपे आहे.त्यासाठी प्रत्येकाने वाचन व लिखाण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ.मार्तंड कुलकर्णी,प्रकाश होळकर, प्राचार्य कौतीकराव ठालेपाटील,राजेश गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,कै. रंगाचार्य गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले.सच्चीतानंद डाखोरे ,पूजा तोडकर व विद्यार्थी संचाने महाराष्ट्र गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विनायकराव कोठेकर व स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने यांनी केले.सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले.सरचिटणीडॉ. शरद कुलकर्णी यांनी आभार मानले.साहित्य संमेलनाच्या यशस्वीते साठी उपाध्यक्ष महेश खारकर ,करुणा बागले,निशा पाटील ,कोषाध्यक्ष डॉ.सतीश मगर,एकनाथ जाधव,सचिव डॉ.सुरेश हिवाळे,डॉ.शरद ठाकर,स्मरणिका संपादक डॉ.राजाराम झोडगे,कार्यकारी संपादक संतोष कुलकर्णी, समन्वयक डॉ. काशिनाथ पल्लेवाड,अजित मंडलिक,बाळू बुधवंत आणि संयोजन समिती सदस्यांनी पुढाकार घेतला होता.
–
जिल्हास्तरीय अक्षर साहित्य संमेलनाची अक्षरायण ही स्मरणिका पालखीद्वारे मंचावर आणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रा.अशोक पाठक यांचे उजेडाला पंख फुटले ,रमेश बोराडे यांचे चक्रव्यूह यासह प्रा.हनुमान मुरगुळे ,प्रा.अनंत काटकर ,शेख मजहर आदींच्या दिवाळी अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील साहित्य व कला क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
Shabdraj www.shabdraj.com