दैनिक शब्दराज / रामप्रसाद ओझा / गंगाखेड – गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (सोमवार, दि. १७) हा अखेरचा दिवस असून, दिवसभर उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली. उपविभागीय अधिकारी तथा निर्वाचन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला आज मोठ्या गर्दीत सांगता झाली.
नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने या पदासाठी एकूण ११ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. तर २६ सदस्य पदांसाठी तब्बल ७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार हे चित्र प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (दि. १८) केली जाणार असून, २१ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर संपूर्ण निवडणूक चित्र स्पष्ट होईल. परंतु प्राथमिक घडामोडींच्या आधारे यंदाची निवडणूक तिरंगी लढतीकडे जात असल्याची चर्चा शहरभर जोरात सुरू आहे.
शहर विकास आघाडी – भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युती यांच्यात अटीतटीची चुरस होणार असल्याचे दिसत आहे.
Shabdraj www.shabdraj.com