गंगाखेड – प्रतिनिधी
वारकरी संप्रदायातील भक्तिगीतांचा मधुर झंकार आणि पारंपरिक गायनशैलीला आपल्या कंठातून अप्रतिम उंचीवर नेणाऱ्या ज्येष्ठ गायिका श्रीमती गोदावरी ताई मुंडे यांना यंदाचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला असून गंगाखेडसह परभणी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गंगाखेड तालुक्यातील बडवणी येथे २१ जून १९७४ रोजी जन्मलेल्या गोदावरी ताईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, चिकाटी आणि अथक श्रमाच्या बळावर आपली कलात्मक ओळख निर्माण केली. वारकरी परंपरेतील गवळणी, अभंग, भक्तिगीत यांच्या गायनात त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप उमटवली आहे.
राज्यातील तसेच देशभरातील विविध वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या भक्तिरसपूर्ण आवाजाने लाखो श्रोत्यांना आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव दिला आहे. पारंपरिक भजन-कीर्तन परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या गायनातील भक्तीभाव, शब्दांतील अस्सलता आणि त्यांनी जपलेल्या परंपरा लक्षात घेऊन २०२५ सालचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या अभंग आणि गवळणींचे व्हिडिओ आज यूट्यूबसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत.
Shabdraj www.shabdraj.com