सेलू ( नारायण पाटील )
शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलू शहराचे ग्रामदैवत संत श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सव निमित्ताने आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी, ३ डिसेंबर रोजी महाप्रसादाने झाली. या वेळी शेकडो भाविकांनी श्री दर्शन, महाप्रसादासाठी गर्दी केली होती.
यात्रेनिमित्त २७ नोव्हेंबरपासून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीमधून श्रीमद् भागवत कथा निरूपण झाले. सांगताप्रसंगी महाप्रसादाचे यजमान माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे व शिलाताई काकडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन, महाआरती झाली.
यावेळी श्री काकडे म्हणाले की, काकडे परिवाराकडून दरवर्षी महाप्रसादाची ही सेवा अखंड सुरू राहणार आहे. यावेळी
गोंदीकर महाराज, श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी केशवराव मंडलिक, तसेच महाराजांचे वंशज ॲड.लक्ष्मीकांत सुभेदार व रामराव सुभेदार यांचा काकडे यांच्या हस्ते, तर उद्योजक आर.बी.घोडके आणि काकडे यांचा संस्थानच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. आरतीनंतर दहा हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
महोत्सवानिमित्त दीपाली कुलकर्णी, बालासाहेब नेब महाराज, पुरूषोत्तम महाराज वालूरकर यांचे कीर्तन, भजन विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
गुरुवारी, ४ डिसेंबर (श्रीदत्त जयंती) यात्रेचा मुख्य दिवस असून, यानिमित्त दुपारी १२ वाजता महाआरती, महाप्रसाद आहे. दुपारी तीन वाजता ‘श्रीं’ च्या पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ५ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता भागवतकार सुनील महाराज आष्टीकर यांच्या काल्याचे कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. विविध कार्यक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर संस्थान, केशव मंडलिक, वामन मंडलिक, पुरुषोत्तम मंडलिक, सुधीर मंडलिक आणि यात्रा समितीने केले आहे.
आगामी दोन आठवडे यात्रा भरणार आहे. यानिमित्ताने व्यापार वर्गाने विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. मनोरंजक, साहसी खेळ आकाश पाळणे, बच्चे कंपनीसाठी विविध खेळणी, क्रॉकरी, गृहोपयोगी वस्तू, महिलांसाठीच्या इमिटेशन ज्वेलरी, सजावटीची साहित्य, कापड, भांडी आदी विविध प्रकाराच्या दुकानांनी यात्रा भरली आहे. दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांच्या गर्दीने परिसर फुलणार आहे.
Shabdraj www.shabdraj.com