24/08/26
Breaking News

पूर्वजांचा स्मृतिदिन मानवी सेवेने साजरा व्हावा –जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे

गंगाखेड,दि 16 (प्रतिनिधी)-
पूर्वजांच्या स्मृतिदिनानिमित्त केवळ धार्मिक विधी न करता समाजोपयोगी, मानवी सेवेतून तो साजरा करणे ही खरी श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे यांनी केले. गरजू रुग्णांची हृदयरोग तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत एन्जिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे ही समाजासाठी मोठी आणि प्रेरणादायी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक १४ डिसेंबर रोजी गंगाखेड येथील राजेश्वर फंक्शन हॉल येथे बीकेसी ट्रस्ट व आनंद ऋषी हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश अर्बन बँकेचे चेअरमन घनश्याम मालपाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, अहिल्यानगर येथील हृदयरोग तज्ञ डॉ. रविराज गवळी, डॉ. रविंद्र येळीकर, डॉ. तुषार नारे, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेडचे अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात ट्रस्टच्या सचिव मंजुषा दर्डा यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून विविध मानवी सेवाभावी उपक्रम राबवून स्मृतिदिन साजरा केला जातो. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हा संस्कार वडिलांकडून आणि आईकडून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आतापर्यंत ट्रस्टतर्फे ३,५०० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, नारायण ट्रस्टच्या सहकार्याने हजारो दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. माणुसकीची भिंत या उपक्रमातून गरजूंना भांडी, कपडे आदींची मदत केली जाते. तसेच भविष्यात “तेरे मेरे सपने” या उपक्रमांतर्गत विवाहपूर्व मार्गदर्शनासाठी गंगाखेड येथे कार्यालय सुरू करण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दर्डा यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगल अच्छा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर सोमानी, आनंद धोका, मनोज नाव्हेकर, रमेश अवसैकर, अमर करंडे, शुभम अच्छा, वृषभ दर्डा, जावेद खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.शिबीरातुन १५० हृदय रुग्णांची तर १७० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.अवश्य त्या चिकित्सा करीता आनंदऋषिजी हॉस्पिटल ॲण्ड हार्ट सर्जरी सेंटर अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …