दै. शब्दराज/गंगाखेड:-
तालुक्यातील मालेवाडी येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये (दिनांक ९ जानेवारी शुक्रवार) रोजी शाळा अंतर्गत विज्ञान प्रयोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाची गोडी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती देवकते या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख रावसाहेब चंदे,शिवाजीराव राठोड उपस्थित होते.तसेच संस्थेचे मार्गदर्शक राम चिलगर,मुख्याध्यापक सुरेश चिलगर यांचीही उपस्थिती होती.
विज्ञान प्रयोग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित प्रयोग सादर करत उपस्थितांना विज्ञानातील संकल्पनांचे सोप्या व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले.चंद्रयान मोहिम,गोबर गॅस निर्मिती,ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम,ऊर्जा संवर्धन यांसह अनेक वैज्ञानिक विषयांवर विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल्स व प्रयोग विशेष आकर्षण ठरले.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक करत विज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून भविष्यातील वैज्ञानिक घडण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com