परभणी – वेळ कधीच थांबत नाही; मात्र काही आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही तितक्याच ताज्या राहतात. याचाच प्रत्यय नुकताच जिल्हा परिषद प्रशाला (प्राथमिक) येथील १९९२ च्या दहावीच्या बॅचच्या स्नेहसंमेलनात आला. तब्बल ३२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या बालमित्रांनी आपले वय, पद आणि प्रतिष्ठा क्षणभर बाजूला ठेवत पुन्हा एकदा बालपणाचा निखळ आनंद अनुभवला.
गुरुजनांच्या आशीर्वादाने उजळला सोहळा
या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे लाभलेले गुरुजनांचे स्नेहसंपन्न सान्निध्य. कार्यक्रमाला श्रीमती ताईबाई मुरलीधर भायेकर, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री दिनकरराव प्रल्हादराव पेडगावकर, श्री शिवानंद हरीहरराव कौसडीकर, श्री बळीराम गोपाळराव कंठाळे, श्री दत्तराव मुंजाजी रोडगे, श्री नंदकुमार पुरुषोत्तमराव अबेंकर, श्री सूर्यकांत नागोराव चिकुर्त, सौ. शालिनी केशवराव देशमुख (कुळकर्णी), श्री श्रीधरराव नानासाहेब गायकवाड, सौ. सुप्रिया विजयराव श्रीमाळी, सौ. प्रभावती धर्मदासराव चव्हाण आणि श्री धर्मदासराव रंगनाथ वाव्हळे हे शिक्षकवृंद उपस्थित होते.
ज्यांनी आयुष्याचे धडे दिले, त्या गुरुजनांना समोर पाहून सर्व मित्र-मैत्रिणी भावुक झाले. ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ गुरुजनांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गुरुजनांच्या आशीर्वादामुळे वातावरण भारावून गेले होते. इतक्या वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता.
गाणी, कविता आणि आठवणींची रंगलेली मैफल
कार्यक्रमाची सुरुवात मनोज कुलकर्णी आणि मनोरमा गायकवाड यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने झाली. शिवप्रसाद डागा (राजू) यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनोज कुलकर्णी यांच्या मैत्री आणि गुरुजनांवरील स्वरचित कवितांनी कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. यावेळी काही बालमित्रांचे वाढदिवस सामूहिकरीत्या साजरे करण्यात आले. त्यामुळे स्नेहसंमेलनात मैत्रीचा गोडवा अधिकच वाढला.
पुन्हा एकदा जगलो बालपण…
दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात सर्वांनी आपली दैनंदिन जबाबदारी विसरून मनसोक्त नाचत-गात बालपणाच्या आठवणींमध्ये रममाण झाले. “एक दिवस का होईना, पण पुन्हा एकदा लहान होऊन जगता आले,” अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
“तासनतास गप्पा मारूनही, बरंच काही बोलायचं राहिलंय,
जुन्या आठवणींच्या गाठोड्यात, आता बरंच काही साठवलंय!”
जड अंतःकरणाने निरोप
कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा आपल्या-आपल्या आयुष्याच्या प्रवाहात परतताना सर्वांचे पाय जड झाले होते. अश्रूनयनांनी आणि “पुन्हा लवकरच भेटू” या आश्वासनासह एकमेकांचा निरोप घेताना मैत्रीचे नाते अधिक दृढ झाले.
“मैत्रीचा हा प्रवास आपला, असाच अखंड चालू ठेवूया,
पुन्हा एकदा भेटण्यासाठी, ओढ आपली अशीच जपूया!”
यशस्वी आयोजनासाठी वर्षभराची मेहनत
हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मागील वर्षभरापासून शिवप्रसाद डागा (राजू), सुहास लांडगे, कविता सोमाणी/झंवर, जयश्री अबंटकर, अंजली मालपाणी सारडा, जयश्री देशमुख, रंजना वाघमारे रासवे आणि राजेश्री बानोले यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच इतर सर्व बालमित्रांनीही आपल्या परीने सहकार्य केले. या आगळ्यावेगळ्या स्नेहसंमेलनाची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.
Shabdraj www.shabdraj.com