24/03/26
Breaking News

सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी

सेलू दि ५ ( नारायण पाटील )
शहरात अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क परिसर, सातोना रोड येथे ११ मार्च ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पारायण सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात रोज २५००० वाचक पारायण करतील. भोजनासाठी वेगळा मंडप केला असून एकावेळी ३००० हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतील.पाणी पुरवठा, स्वच्छतेसाठी नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य तर सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सज्ज असेल.

ऐतिहासिक भव्य ग्रंथदिंडी

फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या निमित्ताने बुधवार ( दि‌. ११ ) रोजी हेलिकॉप्टरने शहरात ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका येतील. सकाळी ९ वाजता सेलूचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ग्रंथदिंडी निघेल. क्रांतीचौक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, नूतन महाविद्यालय, रायगड कॉर्नर मार्गे अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क परिसर, सातोना रोड येथे पारायण स्थळी पसायदान होऊन ग्रंथदिंडीचा समारोप होईल. या ऐतिहासिक भव्य ग्रंथदिंडीत पालखी, लेझीम पथक, रथ, ७५० पताका खांद्यावर घेऊन चालणारी वारकरी,फेटेधारी ज्येष्ठ नागरिक,तुळशी घेऊन चालणाऱ्या महिला, कलशधारी महिला, टाळकरी,ज्ञानेश्वरी नावाच्या मुली, शहरातील भजनी मंडळ असतील. ग्रंथदिंडीवर हेलिकॉप्टरने आणि जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

सात दिवस अशा असतील किर्तन सेवा

फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात १२ मार्च ते १९ मार्च या कालावधीत ह.भ.प. नामदेव महाराज चारठाणकर, मधुसूदन महाराज दैठणकर, १००८ स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज, सोपान महाराज सानप, पुरूषोत्तम महाराज पाटील, विशाल महाराज खोले, अच्युत महाराज दत्तापुरकर, अनिल महाराज पाटील, संतवीर बंडातात्या कराडकर, ज्ञानेश्वर माऊली कदम ( मोठे माऊली ), उमेश महाराज दशरथे, महादेव महाराज राऊत, संजय महाराज पाचपोर, नामदेव महाराज शास्त्री, भगवानगड यांची सकाळी ११ ते १ आणि रात्री ८ ते १० किर्तन सेवा होईल. बुधवार ( दि. १८ ) रोजी दुपारी २ ते ५ ‘ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे भक्तीसामर्थ ‘ या विषयावर कथा तर गुरूवार ( दि. १९ ) रोजी सकाळी ११ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली) यांचे काल्याचे किर्तन होईल.

१२ मार्च ते १७ मार्च कालावधीत दुपारी २ ते ५ या वेळेत राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांची श्रीमहाभारत संदेश कथा होईल.

अशी माहिती फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा संयोजन समितीने दिली.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …