प्रतिनिधी | गंगाखेड.
गंगाखेड शहरातील अनेक हॉटेल, ढाबे व खाद्यव्यवसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळे सामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हॉटेलांची तपासणी करून त्यांना व्यावसायिक १९ किलोचा गॅस सिलेंडर वापरणे बंधनकारक करावे, अशी मागणी गंगाखेड येथील अक्षय गॅस एजन्सीकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबत एजन्सीच्या वतीने तहसीलदार गंगाखेड यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील हॉटेल व खाद्यव्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची शक्यता असून, त्यामुळे घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे.
म्हणूनच प्रशासनाने शहरातील सर्व हॉटेलांची नियमित तपासणी करून त्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर (Commercial Cylinder – 19 kg) वापरणे सक्तीचे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यासाठी महिन्यातून किमान एकदा तपासणी मोहीम राबविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गॅस एजन्सीने या संदर्भातील निवेदनाची प्रत गंगाखेड पोलीस ठाण्यालाही सादर केली असून, संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सामान्य नागरिकांच्या हक्काचा घरगुती गॅस व्यावसायिक वापरासाठी वापरला जात असल्यास ती गंभीर बाब मानली जात असून, प्रशासनाने आता ठोस पावले उचलणार का, असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com