25/06/26
Breaking News

अवैध वाळू प्रकरणी बातम्या लिहिल्याचा राग; पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप, तलाठ्यावर कारवाईची मागणी !

पाथरी प्रतिनिधी
तालुक्यातील डाकूपिंपरी परिसरातील अवैध वाळू उत्खननाबाबत वारंवार बातम्या प्रकाशित केल्याचा राग मनात धरून महसूल विभागातील तलाठी अरविंद चव्हाण यांनी पत्रकार गजानन घुंबरे यांच्या विरोधात धमकीवजा भाषा वापरून कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी गजानन घुंबरे यांनी १ मार्च ते ९ मार्च या कालावधीत डाकू पिंपरी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या. या बातम्यांमध्ये त्या भागातील ग्राम महसूल अधिकारी अरविंद चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित तलाठ्याला केवळ सहा महिन्यांसाठी अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र तो तीन वर्षांहून अधिक काळ त्या ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान मानवत येथील एका चहाच्या हॉटेलवर काही व्यक्तींशी बोलताना पत्रकार गजानन घुंबरे यांचा बंदोबस्त करावा लागेल अशी गंभीर भाषा वापरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुक्त आणि निर्भीड पत्रकारितेवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी पाथरी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर पत्रकार विठ्ठलराव भिसे , धनंजय देशपांडे , एल. आर. कदम, राजकुमार गायकवाड , स्वप्निल ब्रम्हराक्षे, विठ्ठल निसर्गंध , सुधाकर गोंगे, प्रकाश लालझरे, सलमान सय्यद, खालेद नाज आणि रमेश बिजुले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …