देशात पॅन कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू होणार असून, आता फक्त आधार कार्डच्या आधारावर पॅन कार्ड बनवता येणार नाही. त्यासाठी जन्मतारीख (DOB) सिद्ध करणारा वेगळा दस्तऐवज देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सध्या काय नियम आहेत?
आत्तापर्यंत पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड पुरेसं मानलं जात होतं. ई-केवायसी प्रक्रियेमुळे फोटो, सही आणि इतर माहिती थेट आधारमधून घेतली जात होती. त्यामुळे पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि जलद होती.
नवीन नियम काय सांगतात?
१ एप्रिल २०२६ पासून पॅन कार्डसाठी अर्ज करताना फक्त आधार कार्ड देऊन चालणार नाही. अर्जदाराला जन्मतारीख सिद्ध करणारा स्वतंत्र पुरावा सादर करावा लागेल. यामुळे पॅन बनवण्याची प्रक्रिया थोडी अधिक वेळखाऊ होऊ शकते.
हे दस्तऐवज लागणार
नवीन नियम लागू झाल्यानंतर खालीलपैकी कोणताही एक दस्तऐवज देणे आवश्यक असेल:
- जन्म दाखला
- मतदार ओळखपत्र
- दहावीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- अधिकृत शपथपत्र (अॅफिडेविट)
याचा अर्थ असा की, आता फक्त आधारवर अवलंबून राहून पॅन कार्ड मिळवणे शक्य होणार नाही.
३१ मार्चपर्यंत संधी
जर तुम्हाला अजूनही जुन्या सोप्या पद्धतीने पॅन कार्ड बनवायचं असेल, तर ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करता येईल. या कालावधीत आधारद्वारे ई-केवायसी करून सहज पॅन मिळवता येईल.
पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत:
- अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म ४९ए निवडा
- नाव, ईमेल आणि मोबाईल नंबर भरून नोंदणी करा
- ई-केवायसी पर्याय निवडा
- सुमारे १०७ रुपये शुल्क भरा
- आधार लिंक मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा
सरकार हा बदल का करत आहे?
या निर्णयामागे काही महत्त्वाचे उद्देश आहेत. फसवे (फेक) पॅन कार्ड रोखणे, ओळख पडताळणी मजबूत करणे आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक बनवणे हे त्यामागचे मुख्य कारण आहे.
कॉमन सर्विस सेंटर ने देखील याबाबत सूचना दिली आहे की, १ एप्रिलपासून जुन्या पद्धतीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नवीन नियमांनुसारच प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
एकूणच, हा बदल नागरिकांसाठी थोडा त्रासदायक वाटू शकतो, पण दीर्घकालीन दृष्टीने तो सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रणाली निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com