परभणी, दि.२१ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप’ हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपमुळे लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवरून करता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून महामंडळाची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे.
महामंडळाच्या योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. मात्र, संगणक किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत असल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी एजंटमार्फत फसवणुकीच्या घटनाही घडत असल्याने वेळ, खर्च आणि त्रास वाढत होता. या पार्श्वभूमीवर ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व ‘आपले सरकार’ केंद्रांशी करार करून प्रति सेवा ८५ रुपये दराने सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
आता नव्या मोबाईल अॅपमुळे लाभार्थ्यांना अधिक स्वयंपूर्ण, सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहे. नवीन वापरकर्ते मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेलद्वारे ओटीपी च्या सहाय्याने नोंदणी करू शकतात, तर आधीच नोंदणीकृत लाभार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे.
महामंडळाच्या योजनांमध्ये Loi, Sanction व Claim असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येतात. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे आणि पुढील कार्यवाही करणे या सर्व सुविधा अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे.
दरम्यान, क्लेम सादर करणाऱ्या व नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून त्यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होईल.
यासोबतच जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करून गूगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन करण्यात येणार आहे. ही माहिती EHRMS प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध होणार आहे.
संगणकावरील सर्व सुविधा मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हे अॅप डाउनलोड करून वापर करावा आणि या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com