पुर्णा, ता. १५ (प्रतिनिधी)
पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रविवारी धडक कारवाई करत रेतीने भरलेला टिप्पर जप्त केला. या कारवाईत चालकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून चालकासह टिप्पर मालकाविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रविवारी अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदीपात्रात विनापरवाना रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गंजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान एमएच-१२ ईएफ-१७२६ क्रमांकाचा टिप्पर नदीपात्रात अवैधरित्या रेती भरत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तत्काळ कारवाई करून चालक विशाल मारुती अंभोरे (वय २५, रा. धनगर टाकळी, ता. पूर्णा) याला ताब्यात घेतले. तसेच रेतीने भरलेला टिप्पर जप्त करून पुढील कारवाईसाठी चुडावा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस कर्मचारी हनुमान विश्वनाथ ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चुडावा पोलीस ठाण्यात गुरनं. १५८/२०२६ अन्वये कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई फौजदार चंदनसिंग परीहार, पोहेकॉ. रंगनाथ दुधाटे, रामकिशन काळे, डुकरे, वड, हनुमान ढगे, उमेश चव्हाण व संदीप चौरे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. दत्ता काकडे करीत आहेत.
गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर पुन्हा प्रश्नचिन्ह
गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाच्या घटना सातत्याने समोर येत असून महसूल व पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असतानाही रेती माफियांचे धाडस कमी होत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया अधिक तीव्र करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Shabdraj www.shabdraj.com