दै./रामप्रसाद ओझा / गंगाखेड प्रतिनिधी
गंगाखेड शहरालगतच्या गोदावरी नदीपात्रात मृत्यूची भीषण मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. वाळू माफियांच्या बेकायदेशीर उत्खननामुळे तयार झालेल्या खोल, जीवघेण्या खड्ड्यांनी पुन्हा एकदा निष्पाप युवकाचा जीव घेतला आहे.
शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे (वय १९) हा युवक गुरुवारी (दि. १८ जून) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास नातेवाईकांसोबत नदीपात्रात अंघोळीसाठी गेला असता, पोहताना नदीतील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो थेट वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात अडकला. काही क्षणांतच पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी शोधमोहीम राबवून राधाजी याला बाहेर काढले व तात्काळ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असून दुपारी गोदाकाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राधाजीच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार असून या घटनेमुळे संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले आहे. विशेष म्हणजे, महिन्याभरापूर्वीच शहरातील वस्तीगृहातील विद्यार्थ्याचा याच नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने आता नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
प्रश्न थेट आहे – आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार?
वाळू माफियांच्या खुलेआम सुरू असलेल्या उत्खननामुळे नदीपात्र मृत्यूचा सापळा बनत असताना संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या निष्पाप युवकाच्या मृत्यूला जबाबदार कोण, याचा जाब प्रशासनाने तात्काळ द्यावा.
नागरिकांनी मागणी केली आहे की,
गोदावरी नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उत्खनन तात्काळ थांबवावे
धोकादायक खड्डे बुजवून परिसर सुरक्षित करावा
दोषी वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस, कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात
अन्यथा, “प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झालेले हे मृत्यू” अशीच ओळख या घटनांना मिळेल, असा संतप्त सवाल आता गंगाखेडकर विचारत आहेत.
Shabdraj www.shabdraj.com