शात ई-20 (E20) पेट्रोल लागू झाल्यानंतर आता डिझेलबाबतही मोठा बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकार पावले उचलत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलमध्ये थेट इथेनॉल मिसळणे शक्य नसल्याने त्याऐवजी आयसोब्युटेनॉलचा वापर करण्यावर सरकार काम करत असल्याची माहिती दिली आहे. भविष्यात डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी आवश्यक संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत.
डिझेलमध्ये थेट इथेनॉल मिसळता येत नाही. त्यामुळे इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार केले जात आहे. भविष्यात आयसोब्युटेनॉल हा डिझेलचा पर्याय ठरू शकतो. सध्या डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याच्या दिशेने काम सुरू आहे, असे गडकरी म्हणाले.
असे डिझेल बाजारात कधी येणार?
केंद्र सरकारने 2023 पासून ई-20 पेट्रोलची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या देशात विक्री होणाऱ्या ई-20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असते. आता त्याच धर्तीवर डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याच्या प्रस्तावावर दीर्घकाळापासून काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार यावर्षीच्या अखेरीस आयसोब्युटेनॉलयुक्त डिझेल बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत पेट्रोलियमकडून संशोधन
डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळल्यास इंजिन आणि इंधन कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास भारत पेट्रोलियम (BPCL) करत आहे. व्ही. उमाशंकर यांनी सांगितले की, या संशोधनाचे प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहेत. त्यामुळे भविष्यात या इंधनाचा वापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयसोब्युटेनॉल म्हणजे नेमके काय?
आयसोब्युटेनॉल हा देखील अल्कोहोल प्रकारातील जैवइंधन (बायोफ्युएल) आहे. तो इथेनॉलपासून तयार केला जातो. मात्र इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने त्याचे रूपांतर आयसोब्युटेनॉलमध्ये केले जाते. ऊस, धान्य तसेच शेतीमधून मिळणाऱ्या जैविक अवशेषांच्या किण्वन प्रक्रियेतून (फर्मेंटेशन) आयसोब्युटेनॉलची निर्मिती केली जाते. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI)च्या माहितीनुसार इथेनॉलच्या तुलनेत आयसोब्युटेनॉल डिझेलमध्ये अधिक सहज मिसळतो.
याशिवाय आयसोब्युटेनॉलचा फ्लॅश पॉइंट अधिक असल्याने त्याला सहज आग लागत नाही. तसेच त्याची बाष्पीभवन क्षमता (व्होलॅटिलिटी) कमी असल्यामुळे साठवण आणि वापराच्या दृष्टीनेही तो अधिक सुरक्षित मानला जातो.
डिझेलमध्ये थेट इथेनॉल का मिसळता येत नाही?
पेट्रोल आणि डिझेल इंजिनची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असते. पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क प्लगद्वारे निर्माण होणाऱ्या ठिणगीमुळे इंधन पेटते. त्याउलट डिझेल इंजिनमध्ये अत्यंत उच्च दाबामुळे इंधन आपोआप प्रज्वलित होते. याच कारणामुळे डिझेलच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये कोणताही बदल करताना अधिक काळजी घ्यावी लागते. डिझेलमध्ये थेट इथेनॉल मिसळल्यास ज्वलनाची वेळ (कंबशन टायमिंग) बिघडू शकते. त्यामुळे इंजिनमध्ये आवाज निर्माण होणे, कार्यक्षमता कमी होणे किंवा विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळेच डिझेलमध्ये थेट इथेनॉलऐवजी आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे.
वाहनांच्या मायलेजवर परिणाम होणार का?
वाहनांच्या मायलेजवर परिणाम होणार का?
ई-20 पेट्रोलबाबत काही वाहनधारकांनी मायलेज आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याच्या प्रस्तावानंतरही वाहनचालकांमध्ये अशीच चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते आयसोब्युटेनॉलयुक्त डिझेलमुळे मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र डिझेलमध्ये केवळ 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव असल्यामुळे त्याचा परिणाम अत्यल्प राहण्याची शक्यता आहे.
Shabdraj www.shabdraj.com