27/07/26
Breaking News

आता जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, सीजेपीची तडकाफडकी मोठी घोषणा


: कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपलेले आहे. हे आंदोलन संपलेले असले तरीही सीजेपीची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. आंदोलन मागे घेताना सरकार कोणत्याही आंदोलकाविरोधात गुन्हा दाखल करणार नाही, कोणावरही पोलीस कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आश्वासन मिळालेले असले तरीही देशभरात अनेक ठिकाणी सीजेपीच्या आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. या कारवाईबाबत माहिती मिळताच आता सीजेपीने पुन्हा दंड थोपटले आहेत. सीजेपीने सरकारला थेट इशारा दिला आहे.

नेमकी काय घोषणा केली?

देशात वेगवेगळ्या ठिकाणी सीजेपीच्या आंदोलकांवर कारवाई केली जात आहे. हाच मुद्दा देशासमोर मांडण्यासाठी तसेच सीजेपीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सीजेपीने पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सरकारला इशारा दिला. सरकारने सीजेपीच्या आंदोलनात ज्यांनी-ज्यांनी सहभाग नोंदवला, त्यांच्यावर कारवाई करू नये. तसेच कुठेही गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत, अशी मागणी केली. सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, असेही आवाहन रांका यांनी केले.

तर आम्ही जंतर-मंतरवर आंदोलन करणार

तसेच पुढे बोलताना सरकार जर या केसेस मागे घेण्यास तयार नसेल तर आम्ही पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन करू, असा थेट इशाराही रांका यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, सीजेपीने आपल्या पत्रकार परिषदेत देशात कोणकोणत्या ठिकाणी आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, याबाबतही सविस्तर सांगितलं. यावेळी ज्येष्ट वकील कपिल सिब्बल यांनीही मी सीजेपीला कायदेशीर मदत पुरवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच माझी भूमिका ही फक्त कायदेशीर मदतीपुरतीच सीमित आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. यासह देशभरातील वकिलांनी सीजेपीच्या मदतीला पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दिल्लीत फेस डिटेक्शनच्या माध्यमातून कारवाई केली जात असल्याचे मला समजले आहे. ही कारवाई थांबवावी, असे आवाहन सिब्बल यांनी केले आहे. दरम्यान, सीजेपीच्या इशाऱ्यानंतर आता केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Check Also

राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून विरोधी …