06/08/26
Breaking News

राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, सरकारकडे ३ मागण्या

नवी दिल्ली : विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. एकेकाळी भारतातील शिक्षण संस्थेचा जगात गवगवा होता, आता त्याच शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. १५२ पेपरफुटीची प्रकरणे गेल्या १० वर्षात समोर आले आहेत. अनेकदा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण त्या समोर आल्या नाहीत. लाखो विद्यार्थी अनेक परीक्षांची ५-५ वर्षे तयारी करतात. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना सांगितले जाते की पेपरफुटी झाली. ज्यांच्याजवळ ४०-५० लाख आहेत, ते पेपर खरेदी करतात. साडे सात कोटी विद्यार्थ्यांचे आयुष्य मागील काही वर्षात पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र लाजीरवाणी गोष्ट ही आहे की दोषींमधील एकालाही शिक्षा झालेली नाही, असे जळजळीत वास्तव लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले. तसेच केंद्र सरकारकडे आमच्या तीन मागण्या असून आमच्या मागण्यांवरून आपण मागे हटणार नाही, असे स्पष्टपणे राहुल गांधी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर मंगळवारी आंदोलन केल्यानंतर बुधवारी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारकडे तीन मागण्या केल्या.
१) विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. त्यांना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे.  त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार त्यांना का हटवत नाहीत?

२) ज्यांनी विद्यार्थ्यांना मारझोड केली आहेत, पोलिसांनी अमानुषपणे लाठ्या चालवल्या, त्यांच्यावर कारवाई करावी.
३) जे व्यवस्था चालवतायेत, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, आमच्याकडून चूक झाली, जे झाले ते व्हायला नको होते, त्याबद्दल क्षमा करा, असे मोदींनी म्हणायला हवे.

नोकऱ्यांसाठीचे सरकारकडे व्हिजन नाही

तुम्ही इंजिनिअर, डॉक्टर, वकील झालात… सरकारने सांगितले पाहिजे की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ. पण सरकार अप्रत्यक्षपणे सांगते की शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे करू, नोकऱ्या देणार नाही. नोकऱ्यांसाठीचे दरवाजे बंद करू, ज्यांच्याजवळ पैसे त्यांनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळतायेत, असे राहुल गांधी म्हणाले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले,
मॅन्युफॅक्चरिंग– चीनचा माल सगळीकडे, आपण कुठे उत्पादन करतोय?
उद्योजकता– बँकेतील सगळे पैसे दोन तीन लोकांना (उद्योजकांना) मिळतायेत, उद्योजक बनण्यासाठी पैशांची आवश्यकता
कॉर्पोरेट-आयटी जॉब- एआयने सगळं संपवलंय
सार्वजनिक क्षेत्र- खासगीकरणाने वाट लावली आहे
सरकारी नोकरी– ज्यांच्याजवळ ४०-४० लाख आहेत, ते मागच्या दाराने सरकारी नोकरीला लागतात.
असे असताना मार्ग उरतो तो केवळ प्रामाणिक अभ्यास करून सरकारी नोकर भरती, मात्र तिथेही पेपरफुटी होत असेल तर विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला.

Check Also

राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून विरोधी …