06/08/26
Breaking News

विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका,सोनम वांगचुक यांचा पत्रातून आवाहन

गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका, मागण्यांवर संसदेत चर्चा करा, असं आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गुरुग्रामच्या मेंदाता रुग्णालयात उपचार घेत आहेत. वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना चिठ्ठी लिहिली आहे. मुलांवर कारवाई करू नका. तुम्ही त्यांच्या मागण्यांवर चर्चा करा. जर तुम्ही हमी देत असाल तर मी उपोषणही सोडायला तयार आहे, असं वांगचुक यांनी या पत्रात म्हटलं आहे. वांगचुक यांच्या या चिठ्ठीवर आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संसदेत सार्थक चर्चा कराव्यात त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विचार करावा, असंही वांगचुक यांनी या पत्रात म्हटलं आहे.

पोलिसांनी वांगचुक यांचं उपोषण जबरदस्तीने मोडीत काढत त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण वांगचुक यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मात्र, आता थोडी लवचिक भूमिका घेतल्याने सरकार आता त्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Check Also

ढगफुटीचा इशारा… पण ढगफुटी म्हणजे काय? नेमका किती पाऊस पडतो?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा …