परभणी,दि 27 प्रतिनिधी
सन २०२६ चा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ परभणी येथील डॉ. पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, मोबाईल व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि पुस्तकांशी विद्यार्थ्यांची मैत्री घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या दिवंगत श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ येथील ‘संडे क्लब’ आणि देशपांडे परिवार यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप ₹११ हजार रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे आहे.
यंदाच्या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. लीला शिंदे राहणार असून, राज्य शासनाच्या ग्रंथालय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी सतीश चिमणपुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. पवन चांडक हे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (HARC) संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून ‘सृजन आनंदी वाचनपेटी’ हा अभिनव उपक्रम राबवत आहेत. “मोबाईलपासून पुस्तकांकडे” हा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत राज्यातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, पुणे, नाशिक आणि वाशिम अशा दहा पेक्षा अधिक जिल्ह्यांतील १९६ जिल्हा परिषद शाळांना आनंदी वाचनपेट्या भेट देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाचनपेटीत सुमारे १०० निवडक, संस्कारक्षम आणि वाचनीय पुस्तके असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती फिरते ग्रंथालय ठरत आहे.
याशिवाय ‘उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी’, ‘पुस्तकांशी दोस्ती’, ‘एक वाढदिवस–एक पुस्तक’, पुस्तक परीक्षण स्पर्धा, सहकुटुंब वाचन अभियान, बालवाचक गौरव आणि मोबाईल व्यसनमुक्ती जनजागृती असे विविध उपक्रमही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि विचारक्षमतेचा विकास घडविण्यात या चळवळीला उल्लेखनीय यश मिळाले आहे.
‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्काराचे’ हे पाचवे वर्ष आहे. यापूर्वी मिर्झा अब्दुल कय्युम नदवी (छत्रपती संभाजीनगर), जीवन इंगळे (खटाव, जि. सातारा), मोहिनी कारंडे (पुणे) आणि अभिजित जोंधळे (अंबाजोगाई) यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Shabdraj www.shabdraj.com