मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि MPSC च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्याच्या बहुतांश भागात पिके करपली असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, MPSC च्या परीक्षांमध्ये ‘ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न’ आणण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर शासन सकारात्मक असून, आगामी काळात MPSC च्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, साधारणपणे बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती दिसत आहे, बहुतांश भागांमध्ये पिके करपली आहेत, असे दिसत आहे. काही भागात कापूस असेल, मका असेल, यावर सर्वाधिक परिणाम झालेला दिसत आहे. कोकणात भातावरही परिणाम झालेला दिसत आहे. वेगवेगळ्या पिकांवरचा जो परिणाम होत आहे, त्याची आकडेवारी आमच्याकडे येत आहे. त्याच्या आधारावर उपाययोजना करण्यात येणार आहे. सोबतच पिण्याचे पाणी आणि जनावारांचा चारा यावर देखील लक्ष देण्याचे ठरले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
पिण्याच्या पाण्याचे नियोजन या संदर्भात महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर ज्या काही आपल्या पंचायत राज संस्था आहेत त्यांच्याकडे पाणी पुरवठा संदर्भातले नियोजन या संदर्भातले नियोजन करण्यात आले आहे. फील्डवरच्या परिस्थितीच्या अनुरूप काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या उपसमितीचे सचिव म्हणून राजेश अग्रवाल काम करतील. ही समिती फील्डवरुन आलेले जे रिपोर्ट असतील त्यावर निर्णय घेतले जातील, सूचना दिल्या जातील आणि मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही वरिष्ठ लेव्हलचे निर्णय घेऊ, मोठे धोरणात्मक विषय असतील तरच मंत्रिमंडळात घेतले जातील.
Shabdraj www.shabdraj.com