हिंगोली, दि. ३ : हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यापूर्वी सकाळी ७.४६ वाजता ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य धक्का जाणवला. या दोन्ही घटनांमध्ये प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जावे. इमारती, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे.
भूकंपाबाबत सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती मिळाल्यास तिची खात्री अधिकृत शासकीय माध्यमांद्वारे करावी. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आवाहन केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com