22/11/26
Breaking News

राज्यस्तरीय टेनिकाईड स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा आदित्य उबाळे उपविजेता!

गंगाखेड (प्रतिनिधी)दि. ४ ऑक्टोबर :
येथे महाराष्ट्र राज्य टेनिकाईड असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या राज्यस्तरीय टेनिकाईड (रिंग टेनिस) स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, चाटोरी ता. पालम येथील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आदित्य नंदकुमार उबाळे याने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.
महाराष्ट्रातील विविध भागांतून शेकडो विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत आदित्य उबाळे याने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. सिंगल व डबल अशा दोन्ही प्रकारांत त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे चाटोरीसह पालम तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आदित्यला या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक उमेश काळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आदित्यने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य मार्गदर्शन व मेहनतीच्या बळावर राज्यस्तरावर यश संपादन करू शकते, हे आदित्यच्या कामगिरीने अधोरेखित केले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
आदित्य उबाळे याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, चाटोरी यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांकडूनही आदित्यवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Check Also

बँकेच्या ऑनलाईन घोळात शेतकरी कर्जमाफी पासून वंचित, जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार

सेलू (प्रतिनिधी ) बँकेकडून करण्यात आलेल्या ऑनलाईन च्या घोळात सेलू येथील शेतकरी बापूसाहेब रामराव शेरे …