नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता धार्मिक सोहळ्याने सुरुवात झाली आहे. आज नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मुख्य विधी पार पडला. या सोहळ्यामुळे गोदावरीच्या तीरावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनानेही या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी रामकुंड परिसरात आगमन झालं. त्यानंतर त्यांनी गोदावरी पूजन केले आणि गंगा गोदावरी मंदिरात दर्शन घेतले. पुढे ध्वजस्तंभाचे पूजन आणि अन्य धार्मिक विधी पार पडले. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक वातावरणात दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजाचे आरोहण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथेही कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा विधी पार पडला.भमेळ्यात ध्वजारोहणाला विशेष महत्त्व
सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद
कुंभमेळ्यातील ध्वजारोहण ही केवळ धार्मिक औपचारिकता नसून त्याला विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. सिंहस्थ पर्वाच्या धार्मिक परंपरेनुसार गुरूचा सिंह राशीतील प्रवेश हा या पर्वाशी जोडला जातो. या पर्वाच्या प्रारंभाशी संबंधित शुभमुहूर्तावर धर्मध्वज उभारण्याची परंपरा आहे. ध्वज हा शौर्य, त्याग, विजय आणि धर्माचे प्रतीक मानला जातो. त्यावरील सिंहाचे चिन्ह पराक्रम आणि सामर्थ्य दर्शवते, तर भगवा रंग त्याग आणि वैराग्याचे प्रतीक आहे. ध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हेही असतात. धार्मिक मान्यतेनुसार, ध्वजारोहणामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो, अशी श्रद्धा आहे.
कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या आखाड्यांसाठीही ध्वजाला विशेष महत्त्व असते. तो त्यांच्या परंपरेचा, आराध्य दैवताचा आणि कुंभमेळ्यातील सहभागाचा मानबिंदू मानला जातो. प्रमुख आखाड्यांचे महामंडलेश्वर, श्रीमहंत आणि साधू-संत वैदिक मंत्रोच्चारात ध्वजारोहणाचे विधी पार पाडतात.कुंभातील ध्वज अमृतकलशाचे प्रतीक
कुंभमेळ्याची परंपरा समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेशी जोडलेली आहे. या कथेनुसार, समुद्रमंथनातून अमृतकलश बाहेर आल्यानंतर त्याच्या रक्षणासाठी देव आणि ऋषी-मुनींनी विशेष चिन्हांचा वापर केला होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे कुंभमेळ्यातील ध्वज हा अमृत, अमरत्व आणि धर्मरक्षणाच्या संकल्पनेचे प्रतीक मानला जातो. विजय, सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा संदेशही या ध्वजाच्या माध्यमातून दिला जातो.
Shabdraj www.shabdraj.com