महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूला साडे नऊ महिने उलटून गेले तरी अद्याप चौकशी अहवाल समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात होता की घातपात, यावरून संभ्रम कायम असून, त्यांनी याप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे; तसेच, अपघाताच्या दिवशी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो मफलरचा फोटो रोहित पवारांनी ट्विट केला होता, त्या व्यक्तीचे नाव देखील त्यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो, जो व्ही.के सिंग यांच्या मुलाच्या म्हणजे रोहित सिंग यांच्या लग्नातील फोटो असून यात फडणवीसांनी मफलर घातलेला दिसून येत आहे.
कोण आहे मफलर मॅन?
रोहित पवार म्हणाले की, ज्या व्यक्तीचे नाव मी घेणार आहे, मी असे म्हणत नाही की ती व्यक्ती अजितदादांच्या अपघात किंवा घातपाताच्या मागे आहे असे मी म्हणत नाही. पण ज्या कंपनीच्या विमानाचा वापर करून, ज्या कंपनीच्या मालकाचा वापर करून, दादांचा घातपात झाला असावा असे आम्हाला वाटते त्या व्यक्तीला वाचवणारा व्यक्ती कोण हे मी तुम्हाला सांगणार आहे. रोहित सिंगच्या लग्नाला अनेक नेते व कलाकार गेले होते. त्यात प्रफुल्ल पटेल होते तसेच राघव शर्मा होते. त्यानंतर कुठले तरी सॉफ्टवेअर वापरुन या लग्नाचे सगळे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून गायब करण्यात आले. आम्ही त्यातून सुद्धा काही माहिती मिळवली आहे. असे सांगून पवारांनी लग्नातील काही व्हिडिओ दाखवले.
रोहित पवार म्हणाले की, “दादांदा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, अशा अनेक गोष्टी आम्ही सांगितली होती. दादा गाडीने बारामतीला जाणार होते, पण त्यावेळी तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या फोन आला आणि भेटायला येतो असं सांगितलं. एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने त्याच्या फाईलवर सही करायची आहे असं सांगून दादांना थांबवलं. त्यानंतर दादांचा दौरा पुढे गेला आणि दादांना गाडीने प्रवास टाळून विमानानं जावं लागलं. दादांच्या पक्षातील दोन नेत्यांमुळेच त्यांचा गाडीचा प्रवास थांबला आणि दादांना विमानाने जावं लागलं.”
अजित पवारांच्या अपघाताच्या प्रकरणात यंत्रणांनी वेळकाढूपणा केला. अजितदादांचा पक्ष आज सत्तेत असून त्यांच्याच आमदारांनी या प्रकरणात सीबीआय तपासाची मागणी केली, पण ती अद्याप मान्य करण्यात आली नाही, असं रोहित पवार म्हणाले.
‘बारामतीत गुन्हा दाखल करून घेतला नाही’
रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांच्या प्रकरणात आम्ही आधी बारामती पोलीस ठाण्यात गेलो. त्या ठिकाणचे पोलीस आधी गुन्हा दाखल करण्यास तयार होते. मात्र त्यांना कुणाचातरी फोन आला आणि त्यांनी नंतर गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला. राज्यात काहीही क्षुल्लक घटना घडली तरी त्यावर गुन्हा दाखल होतो, पण एवढा मोठा नेता गेला तरी त्यावर काहीही होत नाही. त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाऊन झीरो एफआयआर दाखल केला. नंतर तो गुन्हा महाराष्ट्रामध्ये आला आणि सीआयडीकडे हस्तांतर करण्यात आला. पण सीआयडीने हे जोडपत्र म्हणून स्वीकारलं, गुन्हा म्हणून स्वीकारलं नाही.”
Shabdraj www.shabdraj.com