परभणी,दि 19 ः
परभणीचे गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे पहिल्याच शिक्षण परिषदेत झाले प्रशिक्षणार्थी आणि त्यांनी दिवसभर तीन केंद्रातील शिक्षण परिषदेला स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. २०२५ -२०२६ या शैक्षणिक क्षेत्रातील पहिली शिक्षण परिषद ता.(१८) शुक्रवार रोजी परभणी तालुक्यामध्ये संपन्न झाली.
विशेष म्हणजे परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, आर्वी येथे ते स्वतः ९.५२ वा. उपस्थित होते. त्यांनी दैनंदिन शाळेच्या वेळेला ठीक :१०.०० वा. शाळेतील तीन शिक्षक आणि दोन शिक्षिका यांच्याबरोबर स्वतः राष्ट्रगीत गायन केले. त्यानंतर या केंद्रातील शिक्षण परिषदेला त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की,” शाळेच्या वेळेचे आणि परिषदेच्या वेळेचे काटेकोर पालन करा. एकूणच शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचे योगदान अभ्यासूपणाने सिद्ध करा. ज्या ध्येयाने आपण शिक्षक आणि शिक्षिका म्हणून सेवेत आलात, त्याच ध्येयाने सेवार्थी व्हा,”असे सांगितले. यावेळी आर्वीच्या शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींचा विज्ञानाचा वनस्पतींच्या अवयवांचा कृती पाठ गटशिक्षणाधिकारी आणि उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी अनुभवला. यावेळी विद्यार्थिनींनी अतिशय कल्पकपणे वनस्पतींचे अवयव सांगत असताना वनस्पतींचे मूळ, खोड, फांद्या, पाने आणि फुले या बाबतीत अतिशय समर्पक वर्णन केले.
यानंतर टाकळी – बोबडे केंद्रातील मिर्झापूर या ठिकाणच्या शिक्षण परिषदेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी या परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा शैक्षणिक आणि गुणवत्ता निर्देशांक, इयत्ता पहिलीचा नवीन सीबीएसई अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि त्याची ओळख, निपुण शाळा, विविध शाळा समित्या या विषयांच्या अनुषंगाने जे काही प्रशिक्षणार्थ्यांना सुलभकांनी अध्यापन केले, त्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी केंद्रप्रमुख धनंजय डोंगरे, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, अरुण चव्हाळ, लक्ष्मण गारकर, सुरेखा जाधव आदींची उपस्थिती होती.
यानंतर त्यांनी टाकळी कुंभकर्ण केंद्राच्या ज्ञानसाधना येथील शिक्षण परिषदेला भेट दिली आणि आढावा घेतला. यावेळी केंद्रप्रमुख विजय अहिरे, वैजनाथ लटपटे, प्रकाश पंडित, अनिल बसुळे, नीता पेदेवाड आदींनी त्यांना पुस्तक भेट देऊन सन्मान केला.
गटशिक्षणाधिकारी प्रत्यक्ष ॲक्शन मोडवर…
प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी शिक्षण परिषदेला अत्यंत गांभीर्याने वेळेवर उपस्थित राहावे. अन्यथा परिषदेला वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांवर कारवाई केल्या जाईल, असे त्यांनी यावेळी सुनावले.
शाळेच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांची भूमिका ही प्रत्यक्षपणे सेवेने साकरावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर , परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) सुनील पोलास, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, शौकत पठाण या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मी स्वतः सातत्याने प्रयत्न करत आहे. शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या प्रयत्नांना मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी अधिक जोमाने कार्य करून साथ द्यावी, अशी सादही त्यांनी घातली.
Shabdraj www.shabdraj.com