परभणी,दि 29 ः
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी तसेच संयुक्त संरक्षण सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावरील विविध पदासाठी भरती प्रक्रिया केली जाते. सैन्यदल, वायुदल तसेच नौदलातील पदांसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराची भरती केली जाते. सैन्यातील या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे आवाहन परभणीचे भूमिपुत्र असलेले १/९ गोरखा रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते यांनी मंगळवार (दि.२९) रोजी केले.
श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने आयोजित कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमाचे ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब मोहिते, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी,उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, गुणवत्ता कमी कक्षाचे डॉ. उत्कर्ष किट्टेकर तसेच एनसीसी प्रमुख मेजर डॉ. प्रशांत सराफ यांची उपस्थिती होती.
भारतीय सैन्य दलातील संधी आणि आव्हाने या विषयावर एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते पुढे म्हणाले, सैन्यात करिअर करण्यासाठी ध्येय निश्चिती, शिस्त, नियमितता, प्रामाणिकता, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन, समाज माध्यमापासून दूर राहणे या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. युवकांनी आपल्या क्षमतांना ओळखून आपले करिअर घडवत असताना सैन्यदलातील संधींना शोधावे. यात व्यवसायिक, तंत्रज्ञान आधारित, क्रीडा, व्यवस्थापन, भाषा इत्यादी क्षेत्राला ही प्राधान्य दिले पाहिजे. सैन्यात कायम कमिशन आणि अल्पावधीतील कमिशन अशा दोन प्रकारच्या भरती होतात. या भरतीसाठी मुलाखत हा महत्त्वाचा टप्पा असतो. या मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची मानसिक क्षमता तपासली जाते. त्यासाठीही विद्यार्थ्यांनी तयार व्हावे. आज सैन्यामध्ये मुलींना विशेष संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याचा फायदा विद्यार्थिनींनी घ्यावा. समाज माध्यमातून आपण आपला वेळ वाया न घालवता करिअरवर लक्ष द्यावे जेणेकरून आपण यशस्वी होऊ. यशामध्ये अडथळे निर्माण होतात परंतु ते आत्मविश्वासाने आणि संयमाने दूर करून यशाचे शिखर गाठावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी कारगिल युद्धाच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी उपस्थितांना सांगून सैन्यदलातील वेगवेगळ्या पदासाठीच्या संधी, अनुशासन, नियम, शिस्त आणि करिअरच्या संधी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, एनसीसी कॅडेट्स देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, अनुशासन निर्माण करते तसेच देशसेवेची भावना तयार करते. एनसीसी युनिट मधली मुलींची वाढती संख्या चांगली असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी पौर्णिमा लोखंडे, काजल गिरी, जयश्री जैस्वाल यांनी तयार केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर डॉ. प्रशांत सराफ यांनी, पाहुण्यांचा परिचय श्रुती पतंगे हिने सूत्रसंचालन मोहिनी चव्हाण तर आभार किशोरी राखोंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रूपाली गोटे, अश्विनी लोंढे, भागवत पांढरे,जय कदम आदींनी पुढाकार घेतला.
Shabdraj www.shabdraj.com