04/02/26
Breaking News

बदलत्या ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे “वाळसरा”-लक्ष्मण गाडेकर

सेलू/प्रतिनिधी –
काळ बदलला तसा ग्रामीण भागातील समाजव्यवस्था बदलली असून स्वार्थी, आत्मकेंद्री, असंवेदनशील कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले ज्याने ग्रामीण भागातील महिलांचे, मजुरांचे शोषण वाढले आहे असे मत यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमात आसाराम लोमटे यांच्या “वाळसरा”  ह्या कथासंग्रहावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर होते.
आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, कथा काळाला बांधून ठेवायचं काम करत असते. पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळी गोष्टी सांगायचे. त्या ऐकत, त्यातून सकारात्मक, चांगल्या गोष्टी घेत पुढची पिढी घडत होती. मात्र काळ बदलला.गोष्टी सांगणारे उरले नाहीत. गोष्टी आता तळहातावर आल्यात, पण ह्या गोष्टी काळाला बांधून ठेवू शकत नाही. समोर आल्या की क्षणार्धात त्या निघून जातात.पुढच्या आणि मागच्या गोष्टीचे संदर्भ लागत नाहीत. जुन्या पिढीची आपल्या शेती मातीशी नाळ घट्ट जोडलेली होती.आजच्या पिढीला शेती माती विषयी ममत्व उरले नाही.त्यामुळे गावाकडचे ऐश्वर्य सोडून शहरातल्या खुराड्यात युवा पिढी समाधान मानत आहे.

जुनी लोकं संवेदनशील होती मात्र युवा पिढी कमालीची असंवेदनशील आहे. मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आलं पण आपापसातील नाती मात्र हरवून गेलीत. माणूस माणसात राहिला नाही. आजच्या राजकीय आणि सामाजिक परीस्थितीचे मापदंड बदलले आहेत. ज्या घडल्याच नाहीत त्या गोष्टी आज पेरता येतात आणि चांगल्या पद्धतीने उगवूनही आणता येतात. त्यामुळे गोष्टी पेरणारांची आज मौज आहे. आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कार्यकर्त्यांनी संवेदनशील असावं मात्र भावना विवश नसावं असा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायक कोठेकर यांनी दिला.
यावेळी ग्रंथालयातील पुस्तक मांडणी करण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल दिनेश शिंदे यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनंत मोगल यांनी तर सूत्रसंचालन बालासाहेब पंडीत ह्यांनी केले.आभार प्रदर्शन सुनील कौसडीकर ह्यांनी केले.
कार्यक्रमास ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर,डॉ.शरद कुलकर्णी,प्रकाश धामणगावकर,रामराम बोबडे,दादासाहेब गाडेकर
यांच्यासह रायपूर येथील श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय ढाकणे,माधव गव्हाणे,डॉ.सुरेश हिवाळे यांनी पुढाकार घेतला.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …