‘भारतीय संविधान’ हा केवळ कायद्याचा ग्रंथ नसून, तो प्रत्येक भारतीय नागरिकाने निष्ठेने अनुसरण करण्याचा जीवन मार्ग आहे. भारतीय संविधान हाच खरा धर्मग्रंथ मानून भारतात संविधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या जाती-धर्माच्या कोशातून बाहेर पडून स्वतःला प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय समजावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे असा आग्रह धरत गेल्या अनेक वर्षांपासून संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. अनंत राऊत हे करत आहेत.
३१ जुलै २०२५ रोजी नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त होत आहेत. स्वतःपासून सुरुवात करून आपल्या अवतीभोवती परिसरात संविधान संस्कृती रुजविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आले आहे, असे आज आपल्याला निश्चितपणे म्हणता येते. एवढे मोठे त्यांचे कार्य आहे.
‘भारतीय संविधान’ या एकाच विषयाने झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अनंत राऊत हे होत. बीड जिल्ह्यातील गोटेगाव ( ता. केज) या छोट्याशा गावात एका गरीब, सर्वहारा कुटुंबात १ ऑगस्ट १९६५ रोजी त्यांचा जन्म झाला. कळंब येथील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातून बी.ए. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांनी औरंगाबाद (संभाजीनगर) गाठले. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात त्यांनी एम.ए. मराठी पूर्ण केले. तिथेच एम. फिल. पूर्ण केले आणि १९९० साली नांदेड येथील नामांकित अशा पीपल्स महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.
प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मानवत येथील के. के.एम. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असलेल्या डॉ. प्रकाश मेदककर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबुराव बागुल यांच्या साहित्यावर पीएच.डी. पूर्ण केली. तोपर्यंत त्यांचा संविधानाशी फारसा संबंध नव्हता असे ते स्वतः मान्य करतात. मात्र १९९८ च्या दरम्यान पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदेशाने ‘ न्यायमूर्ती व्यंकटचलय्या संविधान समीक्षा आयोग’ स्थापन केला होता. तेव्हापासून भारतात पहिल्यांदाच संविधान बदलण्याची चर्चा सुरु झाली होती. या घटनेपासून डॉ. अनंत राऊत यांनी भारतीय संविधानाच्या अभ्यासाला सुरुवात केली. तेव्हापासून ते आजतागायत संविधान संस्कृती रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत. आजघडीला डॉ. अनंत राऊत आणि संविधान हे एक समीकरण बनले आहे.
दरम्यानच्या काळात गोदाकाठी वसलेल्या नांदेड शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात त्यांची योग्य जडणघडण झाली. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर आपण समाजाचेही काही देणे लागतो या भूमिकेतून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. विशेषतः स्वतःचे घर झाल्यानंतर या घराचा घरभरणी समारंभ त्यांनी विशिष्ट पद्धतीने घडवून आणला. शहरातील भीक मागत गुजारा करणाऱ्या लोकांना त्यांनी पहिल्या पंगतीला सन्मानाने बसवून जेऊ घातले. प्रत्येक भारतीय माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे ही संविधान संस्कृती रुजविण्याचा पहिला उपक्रम त्यांनी स्वतः घेतला. त्यानंतर ‘ युवा प्रबोधन मंच ‘ ही संघटना स्थापन करून त्याद्वारे त्यांनी संविधान जागृतीसाठी अनेक उपक्रम घेतले.
डॉ. अनंत राऊत हे संविधान अभ्यासक, उत्तम वक्ते आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून लवकरच नावारूपाला आले. त्यांचा विद्यार्थी, युवा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. जवळपास तीस वर्षांपूर्वी त्यांनी संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या कार्याला नांदेड येथे प्रारंभ केला, तेव्हा त्यांना लोकांनी वेड्यात काढले होते. कारण ‘संविधान’ हा फक्त कायद्याचा ग्रंथ आहे, अशी समजूत करुन देण्यात येथील प्रस्थापित व्यवस्था यशस्वी ठरलेली होती. भारतीय राज्यघटनेलाच संविधान म्हणतात हेही बराच काळ लोकांना माहीत नव्हते. भारतीय लोकशाहीचा प्राण असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास दुर्दैवाने भारतात फार उशिरा सुरू झाला. आपल्या जगण्या मरण्याशी संबंधित असलेला हा ग्रंथ अजूनही बहुतांश लोकांपर्यंत पोहोचायचा आहे. डॉ. अनंत राऊत यांना मात्र या ग्रंथाचे मोल फार लवकर समजले. आपल्या प्राध्यापकीचा आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्यांनी योग्य वापर करत भारतात संविधान संस्कृती रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपल्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी सातत्याने संविधान गौरव महोत्सव, संविधान जागरण यात्रा, संविधान केंद्री सांस्कृतिक स्पर्धा आणि संविधानकेंद्री उपक्रम राबविले आहेत.
महाराष्ट्रात आणि देशात विविध ठिकाणी जाऊन त्यांनी भारतीय संविधानाच्या संदर्भात अभ्यासपूर्ण व्याख्याने दिलेली आहेत. भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारतातील सामाजिक आंदोलने, भारतीय घटना समितीची स्थापना आणि या समितीचे ऐतिहासिक कार्य, तसेच प्रत्यक्ष संविधान निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र केलेले कार्य याबाबतचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या स्वातंत्र्य, समता, मानवता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यासंबंधीच्या त्यांच्या धारणा अत्यंत स्पष्ट आहेत.
डॉ. अनंत राऊत हे जसे उत्कृष्ट वक्ते, संशोधक, अभ्यासक, संविधानाप्रति निष्ठा असलेले निष्ठावंत कार्यकर्ते आणि विचारवंत, लेखकही आहेत. भारतीय संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी ‘भारतीयांचा पवित्र आचार ग्रंथ: भारताचे संविधान’ (२००३), ‘ विद्रोह मूल्य ‘( २००५), ‘ धर्म ते राष्ट्रधर्म ‘ (२००६), ‘समाज सुधारकांची तुतारी’ ( २००६), ‘प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये'(२००६),’ भारतीयांचे कल्याणकारी संविधान’ ( २०११), ‘ संविधानाचे तत्त्वज्ञान व जाती अंत ‘ (२०१४), ‘ संविधानमय भारताची दिशा’, ‘संविधानासमोरील वर्तमान आव्हाने’, ‘संविधानवादी साहित्य सिद्धांत आणि दिशा’
( २०२४) इत्यादी सैद्धांतिक मांडणी करणारे वैचारिक ग्रंथ लिहिले आहेत.
संविधानवादी लेखन संस्कृती रुजावी यासाठी त्यांनी स्वतः ‘तळभारत’ ( कथासंग्रह), ‘ अनंताची अभंगवाणी ‘ ( काव्यसंग्रह), ‘ आदरणीय गुरुजी’ (पत्रे), ‘ छिन्नमही ‘ ( काव्यसंग्रह), ‘ चला ठेचू नांगी नांगी'( काव्यसंग्रह), ‘ काहिली'(कादंबरी),’ घालमेल ‘( कथासंग्रह),’ विषजंजाळ'(कादंबरी) आदी सृजनशील कलाकृती निर्माण केलेल्या आहेत.
डॉ. अनंत राऊत हे केवळ बोलके सुधारक नाहीत. तर ते कर्ते कार्यकर्ते आहेत. त्यांनी वारंवार शासनाकडे केलेल्या मागण्यांमुळेच आज सरकारने प्रत्येक पाठ्यपुस्तकात भारतीय संविधानाची प्रास्ताविका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी संविधान केंद्री संस्कृती निर्माण करण्याच्या केलेल्या चळवळीमुळेच देश पातळीवर आज संविधान दिन साजरा होताना दिसतो आहे. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाने होते आहे. मात्र आजच्या जात धर्म भांडवली काळात सरकार संविधानाला बाजूला सारून मनुस्मृती आणू पाहत आहे. हा धोका ओळखला पाहिजे.
ज्या काळात सर्वत्र जाती-धर्माच्या संघटना काम करत आहेत अशा आजच्या विषमतावादी काळात डॉ. अनंत राऊत सर ‘एकला चलो रे ‘ च्या भूमिकेत संविधानाची पताका पुढे घेऊन निघालेले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे हजारो अनुयायी, विद्यार्थी संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या कार्यात सहभागी होत आहेत. ही मोठी उपलब्धी आहे.
भारतासारख्या खंडप्राय देशात हजारो जाती, कित्येक बोलीभाषा, खानपान, केश आणि वेशभूषेच्या पद्धती, चालीरीती, परंपरा, धर्म संप्रदाय आणि जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. या सर्वांना एकत्रितपणे बांधणाऱ्या संविधान संस्कृतीच्या प्रचार – प्रसारासाठी डॉ. अनंत राऊत सर यापुढेही सातत्याने प्रयत्न करत राहतील यात शंकाच नाही. डॉ. अनंत राऊत यांना सेवानिवृत्ती निमित्ताने आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभो हीच निर्मिकाचरणी प्रार्थना…. सत्य की जय हो…जय भीम, जय संविधान…!
– डॉ. मारोती कसाब
मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर जि. लातूर
मो. ९८२२६१६८५३
Shabdraj www.shabdraj.com