गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनासह शहरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला. व्यापारी महासंघ, व्यापारी, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील व शांतता समिती सदस्यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता स्वतंत्र वाहतूक पोलीस कार्यालय देण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक कुमावत यांनी दिले, तसेच जिल्हा विकास निधीतून स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उभारण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. गुलालातील संभाव्य रासायनिक घटकांचा विचार करून गुलालाऐवजी फुलांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, यापूर्वीच्या विविध जयंती व ईदच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील डीजेबाबत मुभा मिळत असल्याच्या चर्चेमुळे निर्बंधांच्या सातत्यावरही प्रश्न उपस्थित झाले.
दरम्यान, शांतता समितीची बैठक राजकीय चर्चेनेही रंगली. आजी-माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व डॉ. रत्नाकर गुट्टे एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याने उपस्थितांना शाब्दिक कुरघोडीचा अनुभव आला. केंद्रे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे एक हजार अतिक्रमणे हटविल्याचा दावा केला, तर आमदार गुट्टे यांनी विकासकामांमध्ये राजकारण करत नसल्याचे सांगितले.
बैठकीस तहसीलदार उषाकिरण शिंगारे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, उपनिरीक्षक राठोड, पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी गित्ते मॅडम, रामेश्वर धोंडगे, पत्रकार, व्यापारी, पोलीस पाटील व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
आश्वासनांची अंमलबजावणी कधी?
वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. स्वतंत्र वाहतूक पोलीस कार्यालय व वाहतूक व्यवस्थेचे आश्वासन स्वागतार्ह असले तरी आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष आणि वेळबद्ध कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Shabdraj www.shabdraj.com