आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लेखी उत्तर
गंगाखेड / प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये नगर विकास विभागाकडे लक्षवेधी सूचना क्रमांक ५७२ मांडली होती. त्यात गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सादर केलेल्या आराखड्याच्या मंजुरीबाबत विचारणा करण्यात आली होती.
यावर उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर देताना सांगितले की, जिल्हाधिकारी परभणी यांनी दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी रुपये ४८.५५ कोटींचा सुधारित विकास आराखडा शासनाकडे सादर केला आहे. सदर आराखड्यास उच्चाधिकार समितीने काही अटींच्या अधीन तत्वतः मान्यता दिली असून, अटींची पूर्तता तपासून अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.
गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या गंगाखेडला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. संत जनाबाई यांची जन्मभूमी असलेल्या या ठिकाणी आषाढी वारी, दिंड्या व पालख्यांच्या मुक्कामामुळे भाविकांची मोठी गर्दी जय होते. त्यामुळे भक्तनिवास, सार्वजनिक शौचालये, अन्नछत्र आदी सुविधा उभारण्यासाठी विस्तृत विकास आराखडा सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, संत जनाबाई मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सादर केलेला आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच राज्य शासनाची अंतिम मान्यता व निधी मिळेल, अशी ग्वाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Shabdraj www.shabdraj.com