04/02/26
Breaking News

लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणुक,गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांमुळे अनुदान मिळणे बंद

मुंबई  ता १५  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या व्यवस्थेच्याच जाळ्यात अडकली आहे. केवायसीच्या नावाखाली विचारण्यात आलेले दिशाभूल करणारे प्रश्न अनेक लाडक्या बहिणींसाठी घातक ठरले असून, हजारो महिलांचे हप्ते अचानक बंद झाले आहेत.

योजनेचा महायुतीला विधानसभेसोबतच इतर निवडणुकीमध्ये फायदा झाला. योजनेच्या सुरवातीला महिलांच्या खात्यात नियमित रक्कम जमा होत होती. मात्र, केवायसी सक्तीची केल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता फक्त एका चुकीच्या क्लिकमुळे महिला अपात्र ठरत असल्याचे समोर आले आहे.

केवायसी करताना ‘माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन घेत नाही’ हा प्रश्न अनेक महिलांना गोंधळात टाकणारा ठरला. महिलांनी घरातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरीवर नाही, असे उत्तर टाकले; परंतु येथे निवृत्तिवेतन घेत नाही यासाठी होय असे उत्तर टाकणे अपेक्षित होते.

या प्रश्नांची भाषा इतकी तांत्रिक आहे की, महिलांनी समजलीच नाही. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांनी महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधल्यानंतर तुमच्या घरात शासकीय नोकरदार असल्यामुळे तुमचे पैसे बंद झाले असल्याचे सांगितले जात आहे.

केवायसीसाठी ३१ डिसेंबर मुदत देण्यात आली होती. यावेळी अनेक महिलांच्या आधारकार्डला मोबाइल नंबर लिंक नव्हते. यामुळे महिलांची केवायसी मुदतीत झाली नाही. मुदतवाढ मिळेल ही अपेक्षा महिलांना होती; परंतु संबंधित विभागाने तातडीने पोर्टलवरून केवायसीची प्रक्रिया बंद करून टाकली आहे. याचा हजारो महिलांना फटका बसला आहे.

Check Also

अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! राज्यभरात सरकारविरोधात संताप

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. केवायसीमध्ये संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारण्यात …