04/02/26
Breaking News

बीडच्या ऐतिहासीक सभेत मनोज जरांगे यांनी दिला मोठा इशारा..

बीड: सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे, पण यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी दिलं. आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. येत्या २९ ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली आहे. आज मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. बीडमध्ये बोलताना त्यांनी 29 ऑगस्टच्या मोर्चाबाबत भाष्य केलं. जरांगे यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना राज्य सरकारला इशारा दिला. यासह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

मराठा आणि कुणबी एकच आहे हे सरकारने आधी मान्य केलं होतं. पण आता आरक्षण दिलं जात नाही. हैदराबाद आणि साताऱ्याच्या गॅझेट लागू करावं, 58 लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही, त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

ओबीसीमध्ये 29 जाती घातल्या, मराठ्यांना वगळलं

देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच 29 जाती या ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या, त्यांची मागणी नसतानाही त्यांना दिलं. पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही, ही पोटदुखी कशासाठीअसा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.

मनोज जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचा डीएनए ओबीसी आहे, मग शेतकरी ओबीसी नाही कात्यांना कर्जमाफी करा. देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. आपण जातीयवादी नाही, त्यांनी तसा अपप्रचार केला. आता देवेंद्र फडणवीसांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण होणार नाही.
आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आता ही शेवटची फाईट आहे, अशी मारायची की आरक्षण घेऊनच यायचं असं मनोज जरांगे म्हणाले.

शांततेत जायचं आणि आरक्षण घ्यायचं

मनोज जरांगे म्हणाले की, “मुंबईत शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घ्यायचं. सरकारने आपल्या मोर्चात काही दगडफेक करणारी माणसे पाठवली आहेत. पण आपण त्यांचा हेतू साध्य करू द्यायचा नाही. ही शेवटची फाईट आहे, मुंबईत जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं.

सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणार, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार असा पण मनोज जरांगे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आयुष्य पणाला लावलंय, उद्या आरक्षणासाठी अंगाचं कातडं जरी फडणवीसांनी मागितलं तरी ते देणार. जातीसाठी मरण आलं तरी बेहत्तर, मी मरायला घाबरत नाही असं मनोज जरांगे म्हणाले. 

Check Also

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सेलूतील जगदंबा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

नारायण पाटील सेलू,दि 22 ः शहरातील शेरे परिवाराचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या शेरे गल्ली मधील …