17/07/26
Breaking News

परभणीत भाजप उमेदवाराचा अवघ्या 1 मताने पराभव,प्रकरण कोर्टात

परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराविरोधात केवळ एका मताने पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवाराने आता कोर्टात धाव घेतली आहे. परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे व्यकंट डहाळे हे केवळ एका मताने विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रसाद नागरे यांचा पराभव केला होता. या निकालावरून तेव्हा तीन तास गोंधळ सुरू होता. सर्व बाजू तपासल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी डहाळे यांचा एका मताने विजय झाल्याचे जाहीर केले होते.

पराभूत भाजप उमेदवार प्रमोद नागरे यांचे या निकालाने समाधान झाले नाही. अखेर त्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेच्या मतमोजणीच्या दिवशी परभणीतील प्रभाग क्रमांक एक मधील या निकालाने मोठा गोंधळ उडाला होता. भाजपच्या उमेदवाराने नोंदवलेला आक्षेप निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी फेटाळून लावत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे यांना विजयी घोषित केले होते. आता याच निकालाविरोधात दाद मागण्यासाठी नागरे यांनी न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणीही नागरे यांनी केली आहे. ज्या पोस्टल मताच्या मोजणीतून ठाकरेंच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले होते, त्या 7 पोस्टल मत करणाऱ्या मतदारांचे कुठलेही कागदपत्रे निवडणूक विभागाकडे नाहीत, असा दावा हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. शिवाय एका सामान्य मतदाराला पोस्टल मताचा अधिकार देण्यात आला, विजयी उमेदवाराच्या नातेवाईकांनीच या प्रभागात 2 वेळा मतदान केले.

तसेच इतर नातेवाईकांनी विविध शहरात नगर परिषदेला मतदान करून परभणीत महापालिकेच्या निवडणुकीतही मतदान केल्याचा आरोप प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवाराकडून करण्यात आला आहे. या आरोपांसह अनेक प्रमाणित पुरावे घेऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

तसेच निवडणूक आयोगाकडे देखील या प्रभागातील निवडणूक पुन्हा पारदर्शकपणे घ्यावी, अशी मागणी भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्यांनी केली आहे. या निवडणूक निकाल प्रक्रियेत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली जात आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …