सेलू : पुस्तके हे आपल्याला खूप मौल्यवान गोष्टी देतात. वाचनातून संस्कार होतात. आजच्या सोशल मीडिया, मोबाईलच्या काळात पुस्तक वाचन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कवयित्री सुमिता सबनिस यांनी केले. त्या नूतन विद्यालयातील ग्रंथालय, मराठी वाङमय विभाग, सांस्कृतिक विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबरचे औचित्य साधून प्रशालेच्या ग्रंथालयात मंगळवार ( दि. १४) ऑक्टोबर रोजी आयोजित वाचन प्रेरणादिन कार्यक्रमात बोलत होत्या. नूतनमध्ये ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ भेट, साहित्यिकांचे मार्गदर्शन, विद्यार्थी वाचकांचा सत्कार उपक्रमांनी वाचन प्रेरणादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक किरण देशपांडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री सुमिता सबनिस या होत्या. तर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. मंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, शंकर बोधनापोड हे उपस्थित होते. पुढे बोलताना सुमिता सबनिस म्हणाल्या की, ” विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कल्पकतेला खूप कमी वाव भेटतो आहे. पण पुस्तक वाचताना आपल्या कल्पकतेला वाव भेटतो. प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याचा आनंद मोठा असतो. आजच्या काळात तंत्रज्ञान हे महत्त्वाचे आहे. पण पुस्तक वाचनही महत्त्वाचेच आहे. मोबाईल हा काळजीपूर्वक आणि गरजेपुरताच वापरायला हवा.” असेही त्या म्हणाल्या. सहशिक्षक सूर्यकला सूर्यवंशी यांनी अक्षरभेट उपक्रमांतर्गत ग्रंथालयास ग्रंथ भेट दिली. कार्यक्रमात प्रशालेतील ग्रंथालयाचे वाचक विद्यार्थी प्रतीक खुळे, अनुष्का नरवडे, शिक्षा खुळे, स्वरूपा मोरे आणि प्रशालेतील साहित्यिक ज्येष्ठ शिक्षक कवी, गीतकार अशोक लिंबेकर, मराठी विभाग प्रमुख कवी डॉ. सुरेश हिवाळे, संभाजी रोडगे, कवयित्री संध्या फुलपगार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग्रंथपाल अंजली देशपांडे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन गोपाळ आमले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभू भुसारे, मुकुंद डमरे, उमेश क्षीरसागर, रामेश्वर पवार, गोविंद रामपुरकर यांनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com