प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या जन्मदिनी सामाजिक उपक्रम
परभणी – शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा करीत वसमत रोडवरील स्नेह महिलांच्या वृद्धआश्रमातील ४० महिलांना पांघरून, फराळ आणि किराणा सामान देत आगळावेगळा जन्मदिन साजरा केला.
सदरील कार्यक्रम गुरुवार (दि.२३) रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, वृद्धाश्रम सचिव सविता अहिरे, माऊली वाघमारे, प्रा. राजेंद्र देशमुख, विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. जाधव यांना पुष्पहार घालून अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी ओमप्रकाश यादव म्हणाले, आजच्या पिढीला आजी-आजोबा सोबतच आईवडीलांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी नैतिक मूल्यांची शिकवण शालेय जीवनापासून करून देणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. जाधव हे नेहमीच सामाजिक जाणिवेतून असे उपक्रम राबविताना दिसतात. त्यांची ही जाणीव सर्वांनी आत्मसात करून सामाजिक उन्नतीसाठी कार्य करावे असे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, आपला जन्मदिन वृद्ध आश्रमात साजरा केल्याने अबाळग्रस्तांना प्रेरणा मिळते आणि नव्या दमाने जगण्याची उमीद जागी होते. समाजात नैतिक आणि सामंजस्यपणा कमी होत आहे अशावेळी सुशिक्षित माणसांनी समाजाची विस्कटलेली घडी बांधण्याचे काम केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी डॉ.जयंत बोबडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित वृद्ध महिलांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य भेट देण्यात आले. वृध्दांसोबत जन्मदिन साजरा करीत असताना उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा.नितीन चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण कदम, पर्यवेक्षक प्रा. संजय ढवळे, डॉ. जयंत बोबडे, डॉ.तुकाराम फिसफिसे, प्रा.राजेसाहेब रेंगे, डॉ.पी. एच. कोल्हे, प्रा. मयूर टाक, प्रा. आबासाहेब सावंत, रामभाऊ रेंगे, बालाजी बल्लाळ, सदाशिव कदम, सुरेश पेदापल्ली, उमाजी लांडगे, सय्यद सादिक, गणेश गरड, एकनाथ देवकर, लक्ष्मण सोगे, तुकाराम पवार आदींनी पुढाकार घेतला.
Shabdraj www.shabdraj.com