दै. शब्दराज/ रामप्रसाद ओझा, गंगाखेड.
गंगाखेड नगर परिषद तसेच जिल्हा परिषद-पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी नव्याने नियुक्त प्रभारी जिल्हाध्यक्ष मा. बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करून शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला ॲड. संतोष मुंढे, आ.नु.जा. राज्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रविराज देशमुख, राजुशेट सावंत, शहराध्यक्ष शेख युनुस, लक्ष्मण लटपटे, शेख महेबुब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना दुर्राणी म्हणाले, “गंगाखेड नगराध्यक्ष पद काँग्रेस स्वबळावर लढविणार असून, विजय निश्चित आहे. समविचारी पक्षांसोबत चर्चेसाठी दारे मात्र खुली आहेत.”
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसचा आधारस्तंभ म्हणजे जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांची निष्ठा. “जे पक्ष सोडून गेले ते निष्ठावंत नव्हते, फक्त महत्वाकांक्षेसाठी गेले. काँग्रेसचे मतदार आजही काँग्रेससोबत आहेत. जे सोबत उभे आहेत त्यांनाच योग्य मान-सन्मान देत, उमेदवारी देत आम्ही निवडणूक जिंकणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाथरी, सेलू, जिंतूर, पूर्णा आणि गंगाखेड यांसह जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास रविराज देशमुख यांनी व्यक्त केला. “तालुका व शहरात पक्षाची संघटनात्मक रचना अधिक भक्कम करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे,” असेही त्यांनी म्हटले.
यावरूनच, सत्ताधाऱ्यांसकट विरोधकांनीही काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेची दखल घेत पुढील राजकारणाचा विचार करणे आवश्यक झाले असून गंगाखेडच्या राजकारणात रंगत वाढली आहे.
Shabdraj www.shabdraj.com