04/02/26
Breaking News

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गंगाखेड तहसील कार्यालयात ग्राहक जागरण दिंडी कार्यक्रम संपन्न

दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने २४ डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान “ग्राहक जागरण दिंडी २०२५” सप्ताह उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाच्या अनुषंगाने मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी गंगाखेड तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये व ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करणे हा होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक महसूल अधिकारी वैजनाथ फड होते. यावेळी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले,जिल्हा कोषाध्यक्ष सुधाकर चव्हाण,तालुकाध्यक्ष अभिजीत पुरनाळे,शहराध्यक्ष मकरंद चीनके,महिला तालुकाध्यक्ष डॉ. प्रतिभा वाघमारे,तालुका सचिव सय्यद ताजुद्दीन,तालुका उपाध्यक्ष महेमूद शेख,सूर्यमाला मोतीपवळे, आशा रेघाटे, गुणाबाई सोनवणे, सुनिता घाडगे, विलास मंगरूळकर, परशुराम पापडू,रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव प्रवीण रायभोळे,पत्रकार रामप्रसाद ओझा, अतुल कलकोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सय्यद ताजुद्दीन यांनी सांगितले की, ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक ग्राहकाने आपल्या हक्कांची जाणीव ठेवली पाहिजे. वस्तू खरेदी करताना बिल घेणे, प्रमाणित व दर्जेदार वस्तूंचीच निवड करणे तसेच फसवणूक झाल्यास तक्रार नोंदविणे हे ग्राहकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महेमूद शेख यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेबाबत सविस्तर माहिती देत, नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडे सादर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल सहाय्यक गणेश सोडगीर यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त करताना पत्रकार रामप्रसाद ओझा यांनी प्रशासनाच्या वेळकाढू व औपचारिक भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.“दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम केवळ औपचारिकता म्हणून घेतला गेला का?” असा थेट सवाल उपस्थित करत,वेळेवर जबाबदार अधिकारी अनुपस्थित राहणे,कार्यक्रमासाठी आवश्यक फोटो, बॅनर, आसनव्यवस्थेचा अभाव,
निमंत्रित व सामान्य नागरिकांसाठी अपुरा प्रचार-प्रसार,या गंभीर बाबींकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
ग्राहक दिनासारखा महत्त्वाचा कार्यक्रम प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रभावहीन ठरत असेल, तर ग्राहक हक्कांविषयीची जनजागृती केवळ कागदोपत्रीच राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तथापि, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, उपस्थित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचे आभार मानून प्रशासन वगळता इतर सर्वांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे ओझा यांनी नमूद केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …