29/07/26
Breaking News

NCMC स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड  अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बसमधील योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक  यांनी दिली. यापूर्वी 1 ऑगस्टपासून हे कार्ड एसटी प्रवासासाठी अनिवार्य करण्यात येणार होते.

राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.

“एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. या मुदतवाढीमुळे NCMC स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यभरातील सर्वच बसडेपो आणि शहरात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशी, सवलतीमधील प्रवाशांची आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी नागरिकांना हे कार्ड जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रार देखील समोर येत आहेत. त्यामुळे, प्रवासी, नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून आता ही मुदत आणखी एक महिना वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, आता 1 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना स्मार्टकार्ड काढता येईल.

Check Also

देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा, दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन

नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात दिशा …