17/10/26
Breaking News

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; १६० पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे दान

हिंगोली, दि. १७  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात आणि शाळांमधील ग्रंथालये समृद्ध व्हावीत, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकदान शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमातून लोकसहभागाची प्रभावी जोड देत शाळेला १६० पुस्तके आणि विविध शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या उपक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

वाचनातून ज्ञानवृद्धीचा जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि अध्ययन प्रक्रियेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच वाचनाची सवय महत्त्वाची आहे. पुस्तकांमुळे ज्ञानात भर पडते, विचारांना चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

बूक डोनेशन कॅम्पला उत्स्फूर्त सहभाग

सेवा संकल्प अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मनीष आखरे, मिलिंद यंबल, ॲड. सुरेश गडदे, दीपक नेणवानी, गंगाधर लोंढे, फिजिक्स वाला संस्थेचे निकुंज अग्रवाल, संतोष डहाळे, पवन यादव, कुलदीप मास्ट, उषा कोटकर तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुढाकार घेत १६० पुस्तके आणि विविध शैक्षणिक साहित्य शाळेला दान केले. या लोकसहभागातून शाळेच्या ग्रंथालयाला समृद्ध करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दालने खुली होणार आहेत.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी मंजुश्री, उपशिक्षणाधिकारी शेख, शिक्षण विस्तार अधिकारी असोले, केंद्रप्रमुख काळे यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Check Also

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली, दिनांक 17  : अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली आहे. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शासनाने …