सेलू ( प्रतिनिधी )
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या अनुषंगाने सोमवारी १९ जानेवारी रोजी सेलू तहसील कार्यालयात निवडणूक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (रोहयो,परभणी) शोभादेवी जाधव आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक कामात नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, अशा सूचना शोभादेवी जाधव यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत डॉ. शिवाजी मगर यांनी सविस्तर माहिती दिली.
सेलू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १३० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवरील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी १० मुख्य क्षेत्रीय अधिकारी आणि ३ अतिरिक्त अशा एकूण १३ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हे अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २४ जानेवारी, जर दुसरे प्रशिक्षण ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शिवाजी मगर यांनी दिली आहे.
Shabdraj www.shabdraj.com