परभणी,दि 15
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने रासायनिक विज्ञान मंच स्थापन केला,या मंचाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमराव खाडे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, विभागप्रमुख डॉ.सुरज आडे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.भीमराव खाडे म्हणाले, सध्याचा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. या काळात स्वतःच अस्तित्व टिकवायचं असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही. रसायनशास्त्र हे विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध करून देणारे करिअर क्षेत्र आहे. अध्यापन आणि संशोधन क्षेत्रामध्ये विशेष करून अनेक संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने प्रयत्न करावेत. स्पर्धा परीक्षा, संशोधन, शैक्षणिक,औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात रसायनशास्त्र पदवी धारकांसाठी असलेल्या संधीचे सोने विद्यार्थ्यांनी करावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्त्याविषयी सखोल माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्यातील तंत्रज्ञान आणि उपलब्ध संधींचा विचार करून विद्यार्थ्यांनी करिअरचा वेध घ्यावा. महाविद्यालयातील सुविधा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी पुढे जावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ.श्रीनिवास केशट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरज आडे यांनी, सूत्रसंचालन गायत्री खिस्ते हिने तर आभार श्रीनिवास अवचार यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. जी. बी. गुंडलेवाड, डॉ. एन. व्ही. शितोळे, प्रा.पी. के. विभूते, डॉ. पी. आर. जगताप, डॉ. एम. एस. जाधव, संतोष कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com