17/07/26
Breaking News

 संकल्प संस्थेकडून जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पाथरी (प्रतिनिधी):
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

“शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी पाऊल उचलणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव” या विषयावर आयोजित या कार्यक्रमात ऊसतोड कामगार माता, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच हंगामी वस्तीगृहातील स्वयंपाकी महिलांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व, मुलांचे शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी महिलांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ऊसतोड कामगार मातांचा करण्यात आलेला विशेष सन्मान होय. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करताना अनेकदा मुलेही पालकांसोबत जावी लागतात, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. मात्र संकल्प मानव विकास संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्या मातांनी आपल्या मुलांना ऊसतोडणीच्या कष्टाच्या कामात सोबत न नेता गावातच सुरक्षित ठेवून त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले, अशा मातांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला हा धाडसी निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासात आणि आरोग्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मुलांच्या प्राथमिक शिक्षण व पोषणातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील माता-बाल आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर महिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला. याशिवाय स्थलांतरित मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या हंगामी वस्तीगृहात मायेच्या माऊलीप्रमाणे जेवण बनवून त्यांच्या आहाराची काळजी घेणाऱ्या स्वयंपाकी महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
सन्मानित महिलांना संस्थेच्या वतीने फुलांचा गुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी काही महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “पूर्वी मुलांना सोबत ऊसतोडणीसाठी न्यावे लागायचे, त्यामुळे त्यांचे शिक्षण सुटत होते. मात्र संस्थेच्या मार्गदर्शनामुळे आम्ही त्यांना गावात ठेवण्याचा निर्णय घेतला. आज मिळालेला हा सन्मान आम्हाला अधिक आत्मविश्वास देणारा आहे.”
संकल्प मानव विकास संस्थेचा हा उपक्रम केवळ महिला दिनापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा जागर ठरला आहे. मुलांचे स्थलांतर थांबवून त्यांना सुरक्षित शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणाऱ्या या महिला समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …